सोलापूर : पुतण्याकडून चुलत्याची १९ लाखांची फसवणूक | पुढारी

सोलापूर : पुतण्याकडून चुलत्याची १९ लाखांची फसवणूक

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : तावडी (ता. बार्शी) येथील पुतण्याने चुलत्याला मिळालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्याच्या रकमेच्या मुदतबंद ठेवीच्या पावत्यांची कलर झेरॉक्स देऊन 19 लाखांना गंडा घातला. फसवणूक झालेले चुलते निवृत्ती बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या अमोल बागल (दोघे, रा. तावडी) याच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुतण्या अमोल बागल काका निवृत्ती बागल यांच्या प्रत्येक अडीअडचणीत काका निवृत्ती बागल यांच्यासोबत असायचा. त्यामुळे अमोलवर सर्व कुटुबाचा दृढ विश्वास बसला होता. दरम्यान, सन 2017 मध्ये तावडी येथील शेत जमीन कॅनॉल प्रकल्पात गेल्याने शासनाकडून निवृत्ती बागल यांना 24 लाख रूपये मिळाले होते. ते पैसै बार्शीतील बॅकेत जमा झाल्याचे पुतण्या अमोल बागल याला माहीत होते. त्यामुळे ही रक्कम मुदतबंद ठेवीत गुतंवणुकीचा सल्ला अमोल याने निवृत्ती यांना दिला होता. मात्र बँकेच्या व्यवहाराबाबत माहिती नसल्याने निवृत्ती यांनी त्यास नकार दिला होता.

परंतु अमोलने बार्शी येथील आयडीबीआय बँक, पंढरपूर बँक, बँक ऑफ बडोदा या बँकेचे मॅनेजर माझ्या चांगले ओळखीचे असल्याचे त्यांना सांगितले. तुम्ही माझ्यासोबत बँकेत चला असे म्हणून निवृत्ती यांना तो 5 जानेवारी 2018 रोजी बार्शीतील पंढरपूर को-ऑप बँकेत घेऊन गेला. त्याने तेथील मॅनेजरची व निवृत्ती बागल यांची ओळख करून दिली.

मॅनेजरने गुंतवणुकीबाबत महिती दिल्याने त्याच दिवशी निवृत्ती यांनी बँकेत 3 लाख रुपयांची रक्कम मुदतठेव पावती केली. त्यानंतर त्यांनी बँकेतील कर्मचार्‍यास ठेवीची पावती मागितली असता अमोल याने मी पावती नंतर घेऊन येतो असे सांगितले. त्यानंतर तो पुन्हा निवृत्ती यांना 1 मार्च 2018 रोजी बार्शीतील पंढरपूर को-ऑप बँकेत घेऊन गेला. तेथे 7 लाख रुपयाची व 3 लाख रु च्या दोन मुदतठेवीच्या पावत्या केल्या. त्यावेळेसही निवृत्ती यांनी बँक कर्मचार्‍यास ठेवीची पावती मागितली. पण अमोल याने पुन्हा मी पावती नंतर घेऊन येतो, असे सागितले.

दरम्यान, 2 डिसेंबर 2018 रोजी अमोल याने निवृत्ती व त्यांची पत्नी पद्मिनी (अमोलची चुलती) यांना आयडीबीआय बँक शाखा बार्शी आणले. तेथे पुन्हा पद्मिनी हिच्या नावे 6 लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यास सांगितले. त्यानुसार निवृत्ती यांनी पद्मिनी यांच्या नावाने 6 लाख रुपये मुदतठेव पावती केली. त्यावेळीदेखील निवृत्ती यांनी पावत्यांबाबत विचारले असता अमोलने पावत्या परत घेऊन येतो, असे सांगितले.
दुसर्‍या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास अमोलने वरील सर्व मुदत ठेवीच्या कलर झेरॉक्स पावत्या आणूनही दिल्या. त्यावेळी अमोलने त्या पावत्या कोणालाही दाखवू नका, असे सांगितले.

दरम्यान, ठेव पावत्यांची मुदत संपण्याच्या एक महिना आगोदर निवृत्ती बँकेत ठेव रकमेबाबत चौकशी करण्यास गेले. त्यावेळी बँकेतील कर्मचार्‍यांनी त्या पावत्यांची पाहणी केली. त्यावेळी या पावत्या मूळ पावत्यांची कलर झेरॉक्स असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. तसेच ठेवींचे पैसे मुदत पूर्ण होण्यापूर्वीच काढल्याचे सांगितले. तेव्हा निवृत्ती यांना धक्का बसला.

निवृत्ती यांनी पुतण्या अमोल याच्याकडे पावत्यांबाबत व ठेवीच्या पैशांबाबत विचारणा केली असता तो सांगण्यास टाळटाळ करू लागला. वारंवार तगादा लावल्याने अखेर अमोलने ठेवीचे 19 लाख रुपये काढल्याचे कबूल केले. तसेच त्याने निवृत्ती यांना ठेवींचे काढलेले 19 लाख रुपये थोडे थोडे करून देतो असे सांगितले. त्यामुळे निवृत्ती यांनी गुन्हा दाखल केला नव्हता. पण पैसे देण्याचे कबूल करूनही पैसे न दिल्याने निवृत्ती यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याबद्दल निवृत्ती यांनी अमोल याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Back to top button