अक्‍कलकोट : वटवृक्ष मंदिरात प्रकट दिन सोहळा संपन्न; हजारो भक्‍त स्‍वामी चरणी नतमस्‍तक

अक्‍कलकोट
अक्‍कलकोट
Published on
Updated on

अक्कलकोट ; पुढारी वृत्‍तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] अक्कलकोट येथे आज (बुधवार) श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला. आज बुधवार दि.१० एप्रिल स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्‍थितीत करण्यात आली. तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा-प्रभात फेरीस आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरती पूर्वी सुरुवात झाली. काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने श्री स्वामी समर्थांना फळ व मिठाईंचे ५६ भोग नैवेद्य दाखविण्यात आले व नंतर हा नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला.

यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणे करिता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण सोहळा, त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मुर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रीं चा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजासाहेब व प्रथमेश इंगळेंच्या हस्ते, मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या मुख आरतीने श्रींची आरती संपन्न होवून भजनगीत, पाळणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला.

स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन प्रसाद ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले. भाविकांनी स्वामी दर्शन व भोजन महाप्रसादाची तृप्ती अनुभवली. आज दिवसभरात सोलापूरचे स्वप्निल गायकवाड मित्रपरिवार व श्रीशैल म्हेत्रे मित्रपरिवारच्या वतीने स्वामी भक्तांना बुंदी लाडू प्रसाद व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

आज स्वामी प्रकट दिनानिमीत्त तालुक्याचे मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजासाहेब, मातोश्री जयप्रभादेवी राजेभोसले व कुटूंबीय, मा.आ.रवि पाटील, अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरुप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मोहन शिंदे, स्वामलिंग कांबळे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, रामचंद्र समाणे, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, स्वामीनाथ मुमूडले, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रवि मलवे, सचिन पवार, श्रीकांत मलवे, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, कृष्णाबाई घाटगे, पूजा साळुंखे, सुवर्णा जाधव, कल्याणी पाटील, प्रेरणा कासेगावकर, सीमा देगावकर आदींसह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news