सोलापूर : रेल्वे लाईन परिसरात रहिवाशी इमारतीला आग - पुढारी

सोलापूर : रेल्वे लाईन परिसरात रहिवाशी इमारतीला आग

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर मधील सेव्हन हेवन या रहिवाशी इमारतीला मंगळवारी (दि. 26) सायंकाळी आग लागली. इमारतीच्या खालच्या मजल्यावर फायबरच्या पेट्यांनी अचानक पेट घेतला. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरींसह काही मोटार सायकली ही होत्या. त्यामुळे आग क्षणार्धात भडकून काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले.

याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

या इमारतीमध्ये जवळपास 40 ते 45 रहिवासी फ्लॅट आहेत. तेथे तळघरात फायबर पॅकिंगच्या पेट्या ठेवल्या होत्या. आज सायंकाळी अचानक त्यांनी पेट घेतल्याने आगीचे लोट आणि धूर निघू लागला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे यावेळी एकच धावपळ उडाली. यावेळी इमारतीमध्ये अनेक नागरिक अडकून पडले होते. अग्निशमन विभाग तसेच स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
धुराचे मोठे लोळ उठल्याने आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले होते. आगीचा भडका

मोठा असल्याने अग्निशमन विभागाला इमारतीच्या आतमध्ये जाणे शक्य नव्हते. त्यामुळे अधिक तीन गाड्या मागवून विभागाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दरम्यान, या ठिकाणी अग्निशमन विभागाचे प्रमुख केदार आवटे, पोलिस उपनिरिक्षक संदीप शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, उपायुक्त बापू बांगर, वैशाली कडुकर या घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांत करीत इमारतीत आडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Back to top button