बार्शी : मुलाने आईच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय - पुढारी

बार्शी : मुलाने आईच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : मुलाने झोपलेल्या ठिकाणीच जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह ओढत घराबाहेर आणून झुडपात लपवून ठेवण्यात आला होता. ही घटना मंगळवार, दि. 12 रोजी सकाळी बार्शीत उघडकीस आली.

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे संशयित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी हवालदार अरुण माळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

मृत महिला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे हे दोघेजण एकाच ठिकाणी राहत होते. तर रूक्मिणी यांचा लहान मुलगा व पती हे नेहमी भांडण होत असल्याने बार्शी शहरातील डबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. श्रीराम व त्याच्या आईमध्ये नेहमीच पैशांवरून वाद होत असत. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल होत्या.

दरम्यान मंगळवारी सकाळी रूक्मिणी यांचा मृतदेह आढळल्याचा फोन पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी वाणी प्लॉट येथील शिंदे यांच्या घराच्या कपाऊंड मध्ये एका प्लास्टिक पिशवीत रूक्मिणी यांचा मृतदेह असल्याचे दिसून आले ( बार्शी खून ).

त्यानंतर मृत महिलेचे पती नागनाथ फावडे, त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण याच्यांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेस्टसवरुन समजल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यापूर्वीही आई व मुलामध्ये नेहमी भांडण होत असल्याने मुलानेच खून केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान संशईत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button