डॉक्टरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण | पुढारी

डॉक्टरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

विजापूर रस्त्यावर एका नगरात राहणार्‍या डॉक्टरच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञातांनी तिचे अपहरण केले. जाताना संबंधित मुलीने घरातील चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 16 हजार रुपयांची रोकड नेली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित डॉक्टरांची मुलगी ही ऑनलाईन अभ्यास करते, असे सांगून आईचा मोबाईल घ्यायची. पालकांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत ती ऑनलाईन मीटिंग व चॅटिंग करायची. हे आईच्या लक्षात येताच तिच्याजवळचा मोबाईल काढून घेतला. पुन्हा गुरुवारी (दि. 7) सायंकाळी 7.30 वाजता तिने ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी वडिलांचा मोबाईल घेतला.

यावेळी तिने बीटीएस अ‍ॅप्लिकेशनवर दक्षिण कोरियातील लोकांशी ऑनलाईन मीटिंग व चॅटिंग करून नृत्य शिकून नर्तिका बनणार असल्याचे सांगितले. मी आनंदी आहे, माझी काळजी करू नका, असा संदेश मोबाईलवर तिने ठेवला. तसेच आणखी दोन चिठ्ठ्या लिहून ती घरातून निघून गेली. जाताना तिने घरातील 4 तोळे सोन्याचे दागिने व 16 हजारांची रोकड नेली. ती रात्रीपासून गायब असल्याने व घरी परत न आल्याने आई-वडिलांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. पण ती कोठेच सापडली नाही.

अखेर शनिवारी आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. याचा पुढील तपास विजापूर नाका पोलिस करीत आहेत.

Back to top button