देशात डौलाने फडकतो सोलापुरात तयार झालेला तिरंगा ! | पुढारी

देशात डौलाने फडकतो सोलापुरात तयार झालेला तिरंगा !

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतो. हा केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे. ध्वजसंहितेत बदल झाल्यानंतर स्वातंत्र्याआधी दोन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सोलापुरात या ध्वजाची निर्मिती होत असून, हा तिरंगा झेंडा देशभरात राष्ट्रीय सणादिवशी मोठ्या डौलाने फडकत आहे.

या तिरंगा ध्वजाचा आकार २:३ असून २२ जुलै १९४७ मध्ये स्वीकारण्यात आला आहे. बंगळुरू येथील भारताची राजमुद्रा आणि राष्ट्रध्वज कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा (हाताने कातलेले कापड जे महात्मा गांधींनी लोकप्रिय केले होते.)  किंवा रेशमाचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. २००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता. २००२ मध्ये नवीन जिंदाल यांच्या अपिवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. सोलापुरात तयार होणारा तिरंगा झेंडा आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानसह देशाच्या कानाकोपऱ्यात जातात, असे गारमेंट असोसिएशनचे राजू शहा, अमित जैन यांनी सांगितले.

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविल्याने सोलापुरातून २५ लाख तिरंगा झेंड्याची विक्री झाली होती. २६ जानेवारीला तुलनेने याची खरेदी कमी असते.

उदगीर, हुबळी व सोलापुरात निर्मिती

केंद्र सरकारने २०२१ साली ध्वजसंहितेत बदल करेपर्यंत भारतात उदगीर (जि. लातूर) आणि कर्नाटकातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्र होते. आता सोलापुरातही ध्वजांची निर्मिती करण्यात येत आहेत. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकविल्याने सोलापुरातून मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वजांची विक्री झाली होती.

Back to top button