सोलापूर : भीमा केसरी स्‍पर्धेत सिकंदर शेखने पटकावली चांदीची गदा, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान | पुढारी

सोलापूर : भीमा केसरी स्‍पर्धेत सिकंदर शेखने पटकावली चांदीची गदा, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान

सोलापूर; पुढारी वृत्‍तसेवा : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ‘भीमा केसरी’ स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने विजय मिळवला. सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंहला आस्मान दाखवलं. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत पंजाबच्या पैलवानचा पराभव केला. या दोन्ही मल्लांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फेडलं.

कै. भीमराव दादा महाडिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे निमित्त भीमा सहकारी साखर कारखानाच्यावतीने भीमा केसरी कुस्त्यांचे जंगी आयोजन केले होते. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा कुस्तीचा आखाडा बनविण्यात आला होता. दहा हजार प्रेक्षक बसू शकतील अशी भव्य गॅलरी व्यवस्था करण्यात आली होती.

भीमा केसरी स्पर्धेकडं सिकंदर आणि महेंद्र यांच्या उपस्थितीमुळं अवघ्या महारष्ट्राचे डोळे लागले होते. शेवटची कुस्ती सिकंदर शेखची होती. पंजाबचा सहा फूट उंच आणि धिप्पाड असा भूपेंद्रसिंह अजनाला याच्या विरुद्ध सिकंदर शेख कसा भिडणार हे हे पाहण्यासाठी लाखो कुस्ती शौकिन दिवसभर टाकळी सिकंदर कुस्ती आखाड्यात आले होते. भूपेंद्रसिंह अजनाला आखाड्यात उतराला, तेव्हा सर्वच कुस्ती शौकिन सिकंदर शेख कशी टक्कर देणार ही उत्कंठा वाढली होती. चाहत्‍यांना सिकंदरची काळजी वाटू लागली होती. सुरुवातीला भूपेंद्रने सिकंदर याच्यावर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सिकंदरने आपला ठेवणीतला खेळ सुरु करत, डावपेच आखत भूपेंद्रला चितपट करत ‘भीमा केसरी’ खिताब अखेर पटकावला आणी उपस्थित कुस्ती शौकिनी एकच जल्लोष केला.

महेंद्र गायकवाड याची कुस्ती पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा अजनाला या दिग्गज मल्लाशी झाली. हे दोन्ही मल्ल मैदानात उतरल्याबरोबर महिंद्राने आपला नेहमीचा खेळ करण्यास सुरुवात केली. परंतु पंजाबच्या गोरा या मल्लाने पाच सहा-वेळा मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पंचानी योग्य निर्णय व सुचना देत महिंद्रला ओढत खेळण्यास भाग पाडले. ही कुस्ती सुरु होताच महिंद्राने गोराला हवेत उचलून चिटपट केलं. त्यानंतर महेंद्रने विजयी जल्लोष साजरा केला.

नुकत्याच झालेल्या तासगाव तालुक्यातील ‘विसापूर केसरी’ चे मैदान त्‍यानं मारलं होतं. त्यावेळी सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला लोळवले होते. अवघ्या पाच- सह मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचं पारणे फेडले होते. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.

संपूर्ण महाराष्ट्रातील चार ते साडेचारशे पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली होती. यातील पाच कुस्त्या या महत्वाच्या होत्या. या कुस्त्यांची ९ लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा होती. भीमा केसरीसाठी शेवटची लढत ही सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात झाली.

हेही वाचा : 

Back to top button