सोलापूर : शिपायाची मुलगी न्यायाधीश; स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधीशपदी निवड | पुढारी

सोलापूर : शिपायाची मुलगी न्यायाधीश; स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधीशपदी निवड

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परीक्षेत स्नेहा सुनिल पुळुजकर या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. स्नेहा यांचे वडील सुनिल पुळुजकर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई या पदावर तर आई उज्ज्वला या जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका या पदावर आहेत.

सोलापूर येथील सेवासदन प्रशालेतून दहावी तर दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दयानंद लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी पूर्ण केली. सोलापूर विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवून त्यांनी एल. एल. एम. पूर्ण केले. स्नेहा यांचे आई- वडील दोघेही नोकरी करीत असून त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मुलीला शिकवले आहे. स्नेहा या ॲड. ए. बी. अंदोरे यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम पाहत होत्या.

Back to top button