सांगली-इस्लामपूर हा काय रस्ता आहे? | पुढारी

सांगली-इस्लामपूर हा काय रस्ता आहे?

कसबे डिग्रज : मौला कोठावळे

सांगली- इस्लामपूर- पेठ हा रस्ता चौपदरी झाला, मात्र त्याची दुरवस्था कायम आहे. सांगलीवाडी ते डिग्रज फाटा आणि तेथून आष्ट्यापर्यंत तर हा रस्ता कमालीचा खराब आहे. या रस्त्यावरून जाताना प्रवाशांचा आणि वाहनचालकांचा काळजाचा ठोका चुकतो. या खड्ड्यात भरलेला मुरूम अवघ्या चार दिवसांत निघून गेला आहे. खड्डे पुन्हा जसेच्या तसे आहेत.

बराच आरडाओरडा झाला की, या रस्त्यावरील खड्ड्यांत मुरूम टाकून कसेबसे पॅचवर्क केले जाते. मात्र, ते पॅचवर्क अवघ्या चार-पाच दिवसांत निघून जाते. त्यामुळे यासाठी होणारा (आणि दाखवला जाणारा) खर्च वाया जातो. त्यामुळे बांधकाम विभाग या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती का करीत नाही. दरवर्षी पैशांची उधळपट्टी का करतो, असा सवाल विचारला जातो.

मुख्यमंत्री दौरा आणि खड्डे

महापूर आला त्यावेळी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अन्य मंत्री, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी पाहणी दौरा केला. भिलवडी-अंकलखोप येथे जाऊन मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रजला मुख्यमंत्री गेले. नंतर सांगलीकडे याच मार्गावरून प्रवास केला.
मुख्यमंत्री यांचा ताफा या मार्गाने जाणार असल्याने या ठिकाणचे खड्डे त्यावेळी तात्पुरता मुरूम भरून मुजवण्यात आले. परंतु अवघ्या दोन-तीन दिवसांतच पुन्हा खड्डे उघडे पडले होते. उलट ते खड्डे पहिल्यापेक्षा अधिक लांब-रुंद झाले. एवढेच नव्हे तर त्यांची संख्याही वाढली.

दररोज हमखास अपघात

चौपदरी व मोठा रस्ता असल्याने आष्ट्याकडून आणि सांगलीकडून येणारी वाहने गतीने येतात. मात्र, अचानक समोर असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड होते.

त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. खड्ड्यांमुळे होणार्‍या अपघातांमुळे अनेकांना दुखापती होतात. शिवाय वाहनांचे मोठे नुकसान होते. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून प्रवास करण्याचे धाडस कुणी करीत
नाहीत.

Back to top button