पंढरपूर : संचारबंदी कमी करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ - पुढारी

पंढरपूर : संचारबंदी कमी करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरसह 12 गावांत दि. 17 ते 25 जुलैपर्यंत नऊ दिवस प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. त्याला लोकप्रतिनिधी व व्यापारी यांचा विरोध पाहता यातून समन्वयाने मार्ग काढू. संचारबंदी कमी करण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

भरणे यांनी शुक्रवारी (दि. 9) आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे ही बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारीदरम्यान संचारबंदीचा कालावधी कमी करण्यासंदर्भात मुंबई येथे भेटून मागणी केली होती. आढावा बैठकीतही त्यांनी संचारबंदी कमी करण्याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावे वारी अडवू नये. शिवाय शहराला वेठीस धरू नये.

भरणे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधीक व मर्यादित स्वरुपात आषाढी यात्रा सोहळा साजरा होत आहे. यात्रा कालावधीत दि. 20 रोजी एकादशीचा मुख्य सोहळा आहे. तर दि. 24 रोजी गोपाळपूर येथे गोपाळ काला आहे. त्यामुळे एकादशीचा मुख्य सोहळा संपन्न झाला की सर्व पालख्या या मठातच वास्तव्य करणार आहेत. त्यामुळे भाविक मठाबाहेर पडणार नाहीत. त्याचबरोबर बाहेरून कोणी शहरात येणार नाही, याची दक्षता घेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, प्रांताधिकारी यांनी घ्यावी. पण त्यासाठी स्थानिक व्यापारी व नागरिक यांनाही वेठीस न धरता संचारबंदी कमी करत सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करावा.

ते म्हणाले, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, प्रांताधिकारी यांनी दोन दिवसात निर्णय घ्यावा. तत्काळ निर्णय घ्यावा. त्यासाठी प्रसंगी शासनपातळीवर मी चर्चा करून निर्णय घेईन. पण सर्वांच्या भावना लक्षात घेता दोन दिवसांत संचारबंदी कमी करण्याबाबत निर्णय झाला पाहिजे.

भरणे म्हणाले, आषाढी यात्रेत संबधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदार्‍या आणि कामकाज याबाबत पुढाकार घेवून काम करावे. कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याशी समन्वय ठेवून तोडगा काढावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करावे. सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.

यावेळी काही प्रतिनिधींनी वारी नियोजनासंदर्भात सूचना मांडल्या. त्यावर संबधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.

धनगर समाज मुख्यमंत्र्यांची अडवणूक करणार नाही : भरणे

धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून अडवण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावर भरणे यांना विचारता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून अडविण्याबाबतचे निवेदन मला प्राप्त झाले आहे. त्या निवेदनासंदर्भात धनगर समाजातील कार्यकर्त्यांबरोबर विचारविनिमय करून त्यांचे समाधान केले जाईल. धनगर समाज मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखणार नाही. उलट समाजाचे सहकार्य घेऊन मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पाडली जाईल.

Back to top button