

सोलापूर : दिवाळी संपली तरी अद्याप बहुतांश बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी संथ गतीने जमा होत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि सीना, भीमा नदीला आलेल्या पुरामुळे 7 लाख 64, हजार 173 एवढे शेतकरी बाधित झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून 867 कोटी 33 लाख 63 हजार 855 इतकी रक्कम मदत निधी म्हणून मंजूर झाली आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत यातील तीन लाख 52 हजार 696 शेतकऱ्यांच्या खात्यावर 411 कोटी 73 लाख 88 हजार 595 रुपये पाठविण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.
पूर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अनुदान मंजूर झाले असून काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे बँक डिटेल तसेच पंचनामे याचे अपलोडिंगचे काम सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 456 कोटी रुपये जमा होतील, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे अनुदान अतिशय संथ गतीने जमा होण्यास सुरू आहे, याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शासनाने दिवाळीपूर्वी मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळी संपून दोन दिवस झाले तरी मदत निधी जमा करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी प्रलंबित असल्यामुळे अनुदान वितरणात अडथळे येत आहेत.