सोलापूर : कुर्डूवाडीत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांचा पर्दाफाश | पुढारी

सोलापूर : कुर्डूवाडीत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांचा पर्दाफाश

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कुर्डूवाडी शहरांमध्ये बनावट नोटा चालविणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

हर्षल शिवाजी लोकरे (वय २०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि सुभाष दिगंबर काळे (वय ३६, रा. भोसरी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

कुर्डूवाडी शहरांमध्ये काही महाविद्यालयीन तरुण हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुर्डूवाडी शहरातील टेंभुर्णी चौकामध्ये सापळा लावला होता. त्यावेळी हर्षल लोकरे हा बनावट नोटा चलनात आणत असताना रंगेहात सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला या बनावट नोटा सुभाष काळे याने चलनात आणण्यासाठी दिल्या असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून पोलीस पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ दुचाकी (एम एच ४५ जे ३७०४) वर थांबलेल्या सुभाष काळे यास ताब्यात घेतले. त्यावेळी काळे याच्याकडेही बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांनाही अटक केली. दोघांकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

या बनावट नोटांचे रॅकेट सुभाष काळे हा चालवीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून सुभाष काळे हा या नोटा कुठून आणत होता. या बनावट नोटांची छपाई कोठे होत होती. या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या रॅकेटच्या माध्यमातून बाजारात किती रुपयांच्या बनावट नोटा आलेल्या आहेत या सर्व बाबींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे समजते.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, पिराजी पारेकर, नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, सलीम बागवान, रवी माने, घोरपडे, दिलीप थोरात आदींनी केली.

हेही वाचा…

Back to top button