सोलापूर : ग्रामपंचायत निवडणूक; अखेरच्या दिवशी विक्रमी 6,947 अर्ज | पुढारी

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणूक; अखेरच्या दिवशी विक्रमी 6,947 अर्ज

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जवळपास 189 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 189 सरपंचपदासाठी 1,068; तर सदस्यांच्या 646 जागांसाठी आतापर्यंत 5 हजार 879 अर्ज दाखल झाले. सर्व्हर डाऊन असल्याने विविध राजकीय पक्षांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिली होती, त्यामुळेही अर्जांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत होती. ती निवडणूक आयोगाने शेवट दिवशी सायंकाळी साडेपाचपर्यंत केली होती.

जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील जवळपास 15 ते 20 गावांच्या निवडणुका या टप्प्यात होत आहेत. त्यामुळे तालुक्यांचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यासाठी त्या त्या तहसील कार्यालयांत अर्ज दाखल करण्यासाठीची गर्दी वाढली होती. शेवटचा दिवस असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायती मोठ्या आहेत त्या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. तसेच यावेळी सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक चुरस ही सरपंचपदासाठीच होणार आहे. सरपंचपदासाठीही अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.

थेट सरपंच निवडीमुळे सदस्यांसाठी फारसे स्वारस्य लोकांना राहिलेले नाही. शुक्रवारी शेवटच्या दिवशी अर्ज किती दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच यासाठी 7 डिसेंबर रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवट दिवस आहे. त्यामुळे कोणकोणत्या गावात दुरंगी लढत होणार अथवा कोणत्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे 7 डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.

Back to top button