सोलापूर : अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी वृद्ध शेतकऱ्याचे अर्धनग्न आंदोलन | पुढारी

सोलापूर : अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी वृद्ध शेतकऱ्याचे अर्धनग्न आंदोलन

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याने अर्ध नग्नावस्थेत दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आज (दि. २८) दुपारी केलेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली. तर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कुमार नामदेव मोरे असे आंदोलन करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे शेती आहे. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत त्यांच्या शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. परंतु नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे मोरे हे तहसील कार्यालयात आले होते. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अंगावरील कपडे काढून कार्यालयाच्या परिसरात अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले.

यावेळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्याला कपडे घातले. त्याला कार्यालयामध्ये नेऊन कागदपत्रे दाखवली. १० नोव्हेंबर रोजी त्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम टाकल्याची माहिती दिली. त्यानंतर मोरे शांत झाले. एवढ्या दिवसानंतरही चेक कसा जमा झाला नाही? असा प्रश्न केला. यात बँकेकडून काही चूक झाल्याचे दिसल्यास तेथेच मी नग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button