

सोलापूर : होटगी रोडवरील क्रोमा शोरूम फोडून 40 लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरणार्या आंतरराज्य गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 36 लाख 33 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत.
शहरातील होटगी रोडवरील टाटा कंपनीचे क्रोमा शोरुम फोडून एका अज्ञात चोरट्याने शोरुममधील विविध कंपन्यांचे 78 महागडे मोबाईल फोन व एक क्रोमा शोरुमची काळ्या रंगाची सॅक (पिशवी) असा एकूण 40 लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. याबाबत विजापूर नाका पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या टिमने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहून इतर माहितीच्या आधारे माहिती काढली. चोरी करणारा आरोपी हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी-चोरीचे व मोबाईल शॉपी फोडून चोरी केल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. गोपनीय बातमीदारांमार्फत हा आरोपी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फिरत असल्याचे कळाले.
त्या माहितीच्या आधारे रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता (वय 37, रा. बिहार नगर, सत्यभामा चाळ, दिवा, जि. ठाणे) यास अटक केली.त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले 36 लाख 33 हजार रूपयांचे महागडे 67 मोबाईल जप्त केले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.