पंढरपूर : श्री विठ्ठलाचा सात मजली दर्शन मंडप पाडणार | पुढारी

पंढरपूर : श्री विठ्ठलाचा सात मजली दर्शन मंडप पाडणार

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला 7 मजली संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप लवकरच पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी अद्ययावत मंदिराचे ऑफिस व वाहनतळ उभारण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकर्‍यांच्या दर्शनासाठी तिरूपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन रांग उभारण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालगत असलेल्या दर्शन मंडपातील अपुर्‍या सोयींमुळे हा दर्शन मंडप 2018 पासून बंद ठेवण्यात आलेला आहे. या मंडपातील पहिल्या मजल्याचाच दर्शन रांगेसाठी वापर केला जात आहे. मात्र सात मजली दर्शन मंडप भाविकांना चढणे, उतरणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे हा दर्शन मंडप बंद ठेवण्यात आला आहे. हा दर्शन मंडप पाडल्यानंतर या ठिकाणी वाहनतळ आणि मंदिर समितीचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांच्या बैठकीत निर्णय

श्री क्षेत्र तिरूपती बालाजीच्या धर्तीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दर्शनरांग उभारण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांचे शिष्टमंडळ सध्या तिरूपती बालाजी येथे दर्शन रांगेची पाहणी करत आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांसदर्भात लवकरच एक बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये दर्शन मंडप पाडण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Back to top button