सांगोल्यात २५ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांची टोळी गजाआड | पुढारी

सांगोल्यात २५ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांची टोळी गजाआड

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : २५ लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपींच्या टोळीला सांगोला पोलिसांनी अटक केली. या सर्व संशयीत आरोपींना न्यायालयाने बुधवारी (७ सप्टेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगोला तालुक्यामध्ये वाहन, स्टील, इलेक्ट्रिक मोटर, केबल अशी चोरी झाली होती. याबाबतचे गुन्हे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या घटनांचा तपास घेऊन प्रतिबंध घालण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणे गुरनं १०३३ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना माहिती मिळाली की, या गुन्हयातील मोटार सायकल ही सांगोला शहारातील चोरटयांनी चोरी केली आहे. या माहितीच्या आधारे तपास केला असता, आरोपी गणेश भिमराव शिंदे (वय २४ वर्षे रा . मस्के कॉलनी, सांगोला) सचिन बाळासाहेब दिघे आणि स्वप्निल बापु ऐवळे (अनुक्रमे वय ३० व २६ वर्षे, दोघे रा. वासुद, ता. सांगोला) बिरुदेव ऊर्फ बिऱ्या दादासो ऐवळे (रा. फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे पंढरपूर रोड ता. सांगोला) खंडू नामदेव चव्हाण (वय २२ वर्षे रा. मणेरी गल्ली ता . सांगोला ) महेश सुरेश वाघमारे (वय २२ वर्षे रा. भोकरेवस्ती सांगोला ता. सांगोला), अतुल श्रीकांत चंदनशिवे (वय ३० वर्षे रा. वासुद ता. सांगोला) यांनी हे मोटार सायकल व इतर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

या संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरील गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगोला पोलीस ठाणे हद्दीत शहर व ग्रामीण भागातून चोरी गेलेली अशोक लेलँड कंपनीचे ३ लहान टेम्पो, ५ मोटार सायकल, ३.५ टन स्टील, वेल्डींग मशीन, ग्राईन्डर, कटर, पाणबुडी मोटार, केबल असा २५ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याचे अढळून आले.

चोरीची वाहने हस्तगत करण्याची कामगिरी श्रीमती तेजस्वी सातपुते (पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण) हिंमतराव जाधव (अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण) श्रीमती राजश्री पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा), अनंत कुलकर्णी (पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेतील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , अस्लम काझी , अनिल निंबाळकर , अमर पाटील , पैगंबर मुलाणी , गणेश झाडबुके सांगोला पथक तसेच सायबर पोलीस अन्वर अत्तार यांनी मदत करुन सदर चोरी झालेली वाहने व इतर साहित्य हस्तगत केले आहे.

हेही वाचा

Back to top button