सोलापूर : गो सेवकामुळे हौदामध्ये पडलेली गाय सुखरूप बाहेर | पुढारी

सोलापूर : गो सेवकामुळे हौदामध्ये पडलेली गाय सुखरूप बाहेर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट रस्त्यावरील किसान नगर परिसरातील नीलकंठेश्वर प्रशालेजवळ एक गाय घरासमोर असलेल्या हौदामध्ये पडली. गो सेवकाने हौदातून गाईला सुखरूप बाहेर काढले. नीलकंठेश्वर प्रशालेच्या परिसरात असलेल्या रामपुरे यांच्या घरासमोर हौद आहे. रामपुरे कुटुंबियांनी पाणी घेण्यासाठी झाकण काढून ठेवले होते. मोकाट फिरत असलेली गाय हौदामध्ये पडली. विजयकुमार चेंडके यांनी याबाबतची माहिती गोसेवक गोपाल सोमाणी यांना दिली. सोमाणी यांनी तात्काळ आपले सहकाऱ्यांना याची माहिती दिली. सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.

ब्रेकरच्या मदतीने हौद फोडून गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले. गोसेवक गोपाल सोमाणी, राजन शिरशिल्ला, सतीश शिरशिल्ला, लक्ष्मीकांत गुजर यांनी केली. गाईला सुखरूप बाहेर काढल्यानंतर गो सेवकांनी सोलापूरच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी ही गाय आमचीच आहे, असे भासवत मालकी सिद्ध करण्यासाठी रस्सीखेच सुरू केली. या प्रकारामुळे गो सेवकांसह परिसरात जमलेले नागरिकही अचंबित झाले. मालकी हक्काचा तिढा वाढत गेल्याने गोपाल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाईला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

आतापर्यंत असंख्य गायींना जीवदान

नीलम नगर परिसरातील लोकमंगल जीवित हॉस्पिटल परिसरात ड्रेनेज, पुणे रस्त्यावरील डी-मार्टजवळ असलेल्या सर्विस रोडमध्ये अडकलेल्या, दत्तनगर जमखंडी पुलाखाली ड्रेनेजमध्ये अडकलेल्या गायींना गो सेवकांनी यापूर्वी बाहेर काढले आहेत. जमखंडी पुलाखाली चक्क ड्रेनेजच्या घाण पाण्यात उडी मारून गो सेवकांनी गाईचे जीव वाचविले हाेते. आतापर्यंत असंख्य गायींना जीवदान देण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button