सोलापूर: शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर | पुढारी

सोलापूर: शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुखांच्या निवडी आज (दि.२४) जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी मनीष काळजे, अमोल शिंदे, चरणराज चौरे यांच्यावर सोपविली आहे. सोलापूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी मनोज शेजवाल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

दोन-तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेला मोठा हादरा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांचा एक गट वेगळा झाला. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले होते. शिंदे यांनी भाजपसोबत येत राज्यात सरकार स्थापन केले. एवढेच नाही तर मुख्यमंत्री पदाची धुरा शिंदे त्यांच्या खांद्यावर आली. शिवसेनेपासून शिंदे गटाने फारकत घेतल्यापासून खरी शिवसेना कोणाची याबाबतचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्याबाबत न्यायालय काय निर्णय घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी शिंदे गटाने जाहीर करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आज सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने झाल्या. या निवडी करताना सोलापूर लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडी अद्यापही जाहीर केल्या नाहीत. पुढील काही दिवसांत या निवडी जाहीर केल्या जातील. जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांच्या निवडी करताना दोन उपजिल्हा प्रमुखांच्याही निवडी आज जाहीर केल्या आहेत.

तुकाराम मस्के व हरिभाऊ चौगुले यांच्यावर उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. याशिवाय आज मोहोळ तालुका प्रमुखांचीही निवड केली. प्रशांत भोसले यांच्याकडे मोहोळ तालुका प्रमुखांची जबाबदारी दिली आहे. या पदाधिकार्‍यांच्या निवडी एक वर्षासाठी केल्या आहेत. आज मुंबईत शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी निवडीची पत्रे स्वीकारली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button