गुरुजी हजर न झाल्यास ऑगस्टचा पगार नाही | पुढारी

गुरुजी हजर न झाल्यास ऑगस्टचा पगार नाही

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे राखीपौर्णिमेदिवशी समायोजन केले आहे. समायोजित केलेल्या शाळेवर संबंधित शिक्षकांनी रुजू होण्याबाबतचे आदेशही शिक्षणाधिकार्‍यांनी काढले आहेत. मात्र, काही शिक्षक त्या शाळेवर रुजू झाले नाहीत. अशा शिक्षकांचा ऑगस्ट महिन्याचा पगार न काढण्याचे आदेश वेतन अधीक्षकांना शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिले आहेत.

खासगी प्राथमिक शाळांमधील जवळपास 105 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षण विभागाने केले आहे. समायोजनात समुपदेशनाने मिळालेल्या शाळेवर हजर राहण्याचे आदेश शिक्षकांना दिले आहेत. त्यासाठी त्यांना ते असलेल्या शाळेवरून कार्यमुक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांना संबंधित शाळेवर हजर राहून त्याचा रुजू अहवाल सादर करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत. मात्र, काही शिक्षक केवळ एकवेळ त्या शाळेवर जाऊन आम्हाला रुजू करुन घ्या, असे म्हणाले आहेत.

यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यासही सांगितले आहे. असे असतानाही संबंधित मुख्याध्यापकांनी त्यांना प्रतिसाद न दिल्यास त्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला आम्हाला रुजू करून घेतले जात नसल्याबाबत पत्र दिले आहे. मात्र, संबंधित शिक्षकांनी असे करून चालणार नाही. ज्या शाळेत त्यांचे समायोजन झाले आहे, त्या शाळेत वारंवार जाऊन संबंधित मुख्याध्यापकांना सांगून रुजू व्हायचे आहे. शिक्षण विभागाने त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाही संबंधित शिक्षकांना रुजू करून घेण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. एवढेच नाही तर जर संबंधित शाळेने शिक्षकांना हजर करून न घेतल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा ऑगस्ट महिन्याचा पगार न देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्या शाळेमध्ये असलेले अनुदानित पद व्यपगत करण्यासही सांगितले आहे.

पगार हवा असल्यास रूजू व्हा
अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर त्यांनी संबंधित शाळेवर जाऊन रुजू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी किंवा त्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार हवा असल्यास संबंधित शाळेवर रुजू होणे गरजेचे आहे.

Back to top button