पंढरपूर : वाखरीत युवकाचा खून | पुढारी

पंढरपूर : वाखरीत युवकाचा खून

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : वाखरी (ता. पंढरपूर) हद्दीत एका तरुणाचे हात नायलॉनचे दोरीने बांधून तसेच पाठीस दगड बांधून विहिरीत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने टाकून दिले. त्यामुळे या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 22) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. लखन सुनील गांडुळे (वय 25, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

वाखरी, येथील याकुब शेख यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात एक अनोळखी मृतदेह मिळून आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पंढरपूर तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व टीमने त्या ठिकाणी जाऊन पाहिले. मृतदेहाच्या कंबरेस केशरी रंगाच्या नॉयलॉनच्या  दोरीने दगड बांधलेला होता. त्याचबरोबर त्याचे दोन्ही हात दोरीने बांधलेले होते, तसेच पाठीस दगड बांधला होता. पोलीसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटविली असता तो लखन सुनील गांडुळे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांनी मयताचा भाऊ शंभू सुनील गांडुळे, यास बोलावून घेतले. तेंव्हा शंभू याने त्याचा भाऊ लखन हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले.

याबाबत ग्रामीण पोलीसात तक्रारही दिली होती. शंभू याने भाऊ लखन यास कोणीतरी अज्ञात कारणावरून दोन्ही हात बांधून, पाठीस दगड बांधून विहिरीत टाकून खून केल्याची फिर्याद पोलीसात दिली. पोलीसांनी अज्ञात व्यक्‍ती विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

तपास जलद गतीने व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोधण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

Back to top button