मोडनिंबचा पाणीपुरवठा महिन्यापासून बंद | पुढारी

मोडनिंबचा पाणीपुरवठा महिन्यापासून बंद

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा : सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या मोडनिंब शहराचा पाणीपुरवठा 50 लाखांचे वीज बिल थकल्याने महिन्याभरापासून बंद आहे. ऐन पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीची निष्क्रियता दिसून येत आहे. पावसाचे छतावरील येणारे पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
येवती (ता. मोहोळ) येथील ब्रिटिशकालीन पाझर तलावातून पाईपलाईनद्वारे मोडनिंब शहराला पाणीपुरवठा केला जातो.  शहरानजिक असलेल्या सुर्वे प्रांत येथील जलशुद्धीकरण केंद्राततून  पाणी शुद्ध करून शहरातील शिवाजीनगर आणि स्टेशन रोड येथील जलकुंभ भरले जातात. यानंतर नळाद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. थकीत बिलामुळे  येवती तलावातील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
यापूर्वी महावितरणला काही रक्कम जमा केल्याने काही काळासाठी वीजपुरवठा जोडण्यात आला होता. ग्रामपंचायतीने वेळेत बिल न भरल्याने आता मात्र महावितरणने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अवघड झाले आहे. मोडनिंब ग्रामपंचायतीच्या काही ठिकाणी बोअरवेल्स आहेत; मात्र वेळेवर देखभाल न केल्याने त्याही बंद अवस्था आहेत. ग्रामपंचायतने तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
दोन्ही कार्यालयांचे वीज बिल थकीत
मोडनिंब शहराला पाणीपुरवठा येवती पाणीपुरवठा तून होत असून या तलावातील विद्युत मोटरचे बिल हे मोहोळ येथील वीज मंडळाच्या कार्यालयात भरावे लागते. सुर्वे प्रांत येथील जलशुद्धीकरण केंद्र मोडनिंब येथे असल्याने येथील विद्युत मोटारींचे बिल हे टेंभुर्णी येथील वीज कार्यालयात भरावे लागते.
ग्रामपंचायतीकडून कधीही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. सध्या महिन्याभरापासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे. माझ्या हॉटेल व्यवसायाला पाणी कमी पडत असल्यामुळे छतावरून येणारे पावसाचे पाणी भांड्यांमध्ये साठवून ठेवत आहे.
– विजयाबाई निंबाळकर, हॉटेल मालक, मोडनिंब

Back to top button