बार्शी तील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी सात दुकाने फोडली | पुढारी

बार्शी तील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी सात दुकाने फोडली

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : बार्शी तील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी सात दुकाने फोडली. सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भर पेठेत घडलेल्या या प्रकाराने व्यापार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गणेश भीमराव कानडे (वय 39, रा. खंडोबा मंदिराजवळ, सौंदरे ता. बार्शी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

गणेश कानडे यांचे महावीर मार्ग बार्शी येथे बँ्रड लूट ब्रँडेड रेडिमेड गारमेंट होलसेल जिन्सचे दुकान आहे. ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. आज शनिवारी रोजी सकाळी

सहाच्या सुमारास भागातील गणेश अक्कलकोटे यांनी फोन करून दुकान उचकटले असल्याची माहीती कानडे यांना सांगितली. त्यांनी बार्शी येथे दुकानाकडे जाऊन पाहिले असता दुकानाचे शटर मध्यभागी उचकटलेले दिसले.

उचकटलेल्या शटर मधून त्यांनी आत जावू पाहिले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले होते तसेच टेबल कांऊटरचे ड्रॉवर उघडे दिसले. त्यामुळे दुकानातील ड्रॉवर व इतरत्र पहिले असता ड्रॉवरमधील रोख रक्कम व जिन्स पॅकींगचा एक डाग दिसून आला नाही. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचीखात्री झाली. चोरट्यांनी रोख रक्कम 20 हजार रूपये, 47 हजार रूपयांचे जिन्स पॅन्ट चे 100 नग असलेला जिन्स पॅकीगचा डाग असा 67 हजाराचा रोख रक्कम व जिन्स पॅन्ट चोरट्यांनी लंपास केले.

तेथून जवळच बार्शी शहर बाजारपेठ परीसरातील अमित माधव आपटे याचे जुनी चाटे गल्ली येथील आपटे मेडीकल दुकान फोडून रोख रक्कम 4 हजार, प्रविण दलाराम राठोड याचे पांडे चौक येथील सुरज गारमेंट दुकान फोडून रोख रक्कम 4 हजार, अनाराम रूपाराम चौधरी याचे महावीर मार्ग बार्शी येथील पिकॉक लाईफ स्टाईल दुकानामधून रोख रक्क्म रूपये 40 हजार रुपये लांबविले.

तेथीलच अनाराम रूपाराम चौधरी याचे महावीर मार्ग बार्शी येथील पिकॉक लाईफ स्टाईल दुकानामधुन 39 हजार रूपयांचे16 नग लेडीज ड्रेस, गौस म.रफिक तांबोळी याचे राउळ गल्ली टाकणखार रोड येथील जी.एम ट्रेडर्स दुकानामधुन रोख रक्कम 4 हजार रूपये, रणजित संजय आंधारे याचे तेलगिरणी चौकातील रोहीत एजन्सी तेल दुकानामधुन 70 हजार रोख रक्कम, संदीप विजयकुमार बगले याचे सावळे सभागृहचे समोर लातूर रोड येथील बगले मेडिकल दुकान फोडून 18 रूपये रोख मुद्देमाल लांबविला.

एकूण अडीच लाखाचे साहित्य व रोख रक्कम चोरीस गेली. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Back to top button