सोलापूरच्या श्‍वान पथकाकडून दीड वर्षात 16 गुन्ह्यांचा पर्दाफाश | पुढारी

सोलापूरच्या श्‍वान पथकाकडून दीड वर्षात 16 गुन्ह्यांचा पर्दाफाश

सोलापूर : अमोल व्यवहारे :  स्फोटके शोधणारे सोलापूर शहर पोलिस दलातील मीरा हे श्‍वान राज्यात अव्वल ठरले आहे. गेल्या दीड वर्षात सोलापुरातील श्‍वान पथकाकडून 16 गुन्हे उघडकीस आले असून सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयांतील या श्‍वानाचा राज्यात दबदबा निर्माण झाला आहे. स्फोटके शोधणारा बेल्जीयम शेफर्ड जातीचा राज्यातील पहिलाच श्‍वान तत्कालीन पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर यांच्यामुळे सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयाला मिळाला आहे.

बोलकी माणसे गुन्हे करतात आणि मुके कुत्रे त्याचा छडा लावतात. पोलिसांचे श्‍वान पथक हे त्याचे प्रत्यक्ष प्रमाण. सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयात स्नूपी, कायरा, रूबी, निम्मी, चेरी, माया आणि मीरा हे सात श्‍वान असून माया, रूबी निम्मी आणि मीरा हे दोन स्फोटके शोधणे, चेरी हे अंमली पदार्थ शोध तर कायरा आणि स्नूपी हे गुन्हे शोध काम करतात. या सात श्‍वानामध्ये डॉबरमन (स्नूपी व कायरा), लॅब्रॉडॉर (रूबी व निम्मी), जर्मन शेफर्ड (चेरी व माया) आणि बेल्जीयम शेफर्ड (मिरा) जातीची आहेत. त्यामधील माया व मीरा हे दोन श्‍वान बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडे असून उर्वरीत श्‍वान हे श्‍वान पथकात आहेत. सन 2019 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सोलापूर शहर पोलिस दलातील मीरा या श्‍वानाने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस हवालदार लक्ष्मण गणगे, शिवानंद कलशेट्टी, श्रीकांत दोरनाल, संतोष आळग, पोलिस नाईक राजू राठोड, निलेश कारभारी, स्वामीराज बिराजदार, मोहसीन शेख, संतोष गवंडी, अभिजीत देशमुख व सुदर्शन गुंड हे श्‍वानांचे हस्तक (हॅन्डलर) म्हणून कार्यरत आहेत. संशयित वस्तू सापडली की पोलिसांचे श्‍वान पथक या वस्तूची तपासणी करते आणि क्षणार्धात सर्वांचा जीव भांड्यात पडतो. पोलिसांच्या फौजफाट्यातील सर्वात महत्वाचा आणि आपत्कालीन परिस्थितीत भक्‍कम आधार असलेला विभाग म्हणजे बॉम्ब शोधक व नाशक पथक. त्यातही बॉम्ब केवळ हूंगून शोधणारे श्‍वान म्हणजेचे स्निफर डॉग पोलिसांचे हुकमी एक्के.

सोलापुरातील श्‍वान पथकाची कामगिरी
सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयातील श्‍वानांनी 2021 मध्ये 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2022 मध्ये आजपर्यंत चार गुन्हे या पथकाच्या माध्यमातून उघडकीस आणण्यात आलेले आहेत. त्यामुळे या श्‍वानांना व त्यांच्या हस्तकांना पोलिस आयुक्‍तांकडून बक्षीस देऊन गौरविण्यात आलेले आहे.

Back to top button