सोलापूर : विद्यार्थ्यांची सायकल रॅली, नेचर वॉक अन् वक्‍तृत्व स्पर्धा | पुढारी

सोलापूर : विद्यार्थ्यांची सायकल रॅली, नेचर वॉक अन् वक्‍तृत्व स्पर्धा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा वनसंवर्धनदिनानिमित्त वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्याने सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग यांच्या प्रोत्साहनातून इको-फ्रेंडली क्लब आणि जय अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी विद्यार्थ्यांची सायकल रॅली, नेचर वॉक, वक्तृत्व स्पर्धा आणि वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील जय अ‍ॅकॅडमी येथून सुरुवात झाली. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. तांबडे, नौशाद शेख, मयूर दरगड, खुशाल देढीया, अनिल पटवारी, अनिल भारुका, धीरेन गाडा आदी मान्यवरांनी झेंडा दाखवून सायकल रॅलीला शुभेच्छा दिल्या. व्हीआयपी रोड, सात रस्ता, धर्मवीर संभाजी महाराज तलाव, विजापूर रोड, इंचगिरी मठमार्गे सिद्धेश्‍वर वनविहारपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर नेचर वॉकला सुरुवात झाली. सामाजिक वनीकरण विभागाचे संजय भोईटे यांनी विद्यार्थ्यांना झाडी, पक्षी, प्राणी यासंदर्भातील माहिती दिली.

वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. निनाद शहा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लाऊ शकतो, असे उपवनसंरक्षक पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणात संवर्धनाची आवड निर्माण होण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे असे डॉ. शहा यांनी सांगितले. या कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाचे अधिकारी स्वप्निल सोलनकर, जय अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. रतन अगरवाल, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक मदन पोलके, ईको-फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, डॉ. हिरालाल अगरवाल, वनरक्षक श्रीशैल पाटील, अजित कोकणे, धनराज बगले, पवन बारगजे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवी बिराजदार यांनी पर्यावरण गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. रतन अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. आभार परशुराम कोकणे यांनी मानले.राजपूत, भुतडा, रेब्बा

यांचे वक्‍तृत्व स्पर्धेत यश

वनसंवर्धनदिनाच्या निमित्ताने आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘पर्यावरण संवर्धनात माझा सहभाग’, ‘माझ्या स्वप्नातील सोलापूर’, ‘पर्यावरणपूरक सण-उत्सव’ हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणिती राजपूत, द्वितीय क्रमांक अथर्व भुतडा, तृतीय क्रमांक युक्ता रेब्बा यांनी मिळवला. विजेत्यांना आणि उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कापडी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले.

Back to top button