सोलापूर : 75 फुटी तिरंगा उभा कुठे करायचा; प्रशासनापुढे पेच | पुढारी

सोलापूर : 75 फुटी तिरंगा उभा कुठे करायचा; प्रशासनापुढे पेच

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्हा स्तरावर 75 व्या वर्षानिमित्त 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा राष्ट्रध्वज आता कोठे आणि कोणी उभा करायचा, याचा प्रश्‍न जिल्हा प्रशासनापुढे पडला आहे. त्यासाठी प्रशासनाची सर्वबाजूने चाचपणी सुरू झाली आहे. मात्र त्याची जबाबदारी घ्यायला कोणतीच शासकीय यंत्रणा पुढे येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षी पूर्ण झाली. स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग आणि बलिदान दिले. त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या स्वातंत्र्यवीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये तसेच येणार्‍या पिढीला त्याचे स्मरण राहावे यासाठी यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केंद्र शासनाने केले आहे.त्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांनी वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावेत, वेगवेगळ्या स्पर्धा घ्याव्यात, त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन केले आहे.

येणार्‍या पिढीच्या मनामध्ये देशप्रेम जागृत राहावे, यासाठी ‘हर घर झेंडा’ ही एक संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 13 ते 15 ऑगस्ट यादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा महसूल प्रशासनाच्यावतीने संपूर्ण तयारी सुरू केली आहे. मात्र या उपक्रमासाठी निधीची तरतूद कोठून करायची, असा प्रश्‍न आता जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे जिल्हा स्तरावर 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभा करायचा आहे. त्यासाठी तो महापालिकेने उभा करायचा का जिल्हाधिकारी कार्यालयाने उभा करायचा का त्याचे नियेाजन पोलिस प्रशासनाला द्यायचे, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे यामध्ये सोलापूर महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्याचे समजते. या झेंड्यासाठी जागा आणि त्यासाठी येणारा खर्च कोणी आणि कशातून करायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Back to top button