सोलापूर : एसटी उलटल्याने 30 जण जखमी | पुढारी

सोलापूर : एसटी उलटल्याने 30 जण जखमी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर ते गाणगापूर एसटी बस अक्‍कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास उलटल्याने 42 पैकी 30 प्रवासी जखमी झाले. जखमीपैकी 25 जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात, तिघांना अक्‍कलकोट ग्रामीण, दोघांना खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट ग्रामीण रुग्णालयात केवळ एक ते दोन डॉक्टर आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांना देखील या ठिकाणी तात्काळ पाचारण करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेवून सर्व जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. जयकर, महेश कोठे उपस्थित होते. रुग्णवाहिका सोबतच मिळेल त्या वाहनाने जखमीना रुग्णालयात पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टर उपस्थित होते. जखमींची संख्या पाहून खाजगी डॉक्टरांना तात्काळ पाचारण करण्यात आले आहे. गंभीर जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे.

दरम्यान, अक्कलकोट येथील ट्रामा केअर सेंटरची इमारत नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यासाठी अद्याप स्टाफ मंजूर करण्यात आलेला नाही. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील ही मागणी घातली असून तात्काळ मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

Back to top button