शिवसेना कुणाची? : सोलापुरात संपर्कप्रमुख, दोन्ही आमदार शिंदे गटात

शिवसेना कुणाची? : सोलापुरात संपर्कप्रमुख, दोन्ही आमदार शिंदे गटात
Published on
Updated on

सोलापूर; अमृत चौगुले : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडात तत्कालीन संपर्कप्रमुख तथा भूम-परंड्याचे आमदार तानाजी सावंत, जिल्ह्यातील सांगोल्याचे एकमेव आमदार 'काय ती झाडी…काय ते डोंगर… काय ते हाटिल… एकदम ओक्केच' फेम शहाजीबापू पाटील यांनी उडी घेत साथ दिली. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कशीबशी तग धरून असलेली शिवसेना दुभंगली आहे. त्यांच्या जोडीला आता सोलापूरचे आजी-माजी नगरसेवक, युवासेना जिल्हाप्रमुख आदींनी शिंदे गटाची वाट धरली. अजूनही गळती सुरूच असल्याने सेनेला जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे.

एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचेही जवळपास पाच आमदार होते. त्यापैकी बार्शीचे शिवसेना आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्यातून नारायण पाटील, उत्तर सोलापूर तालुक्याचे उत्तमप्रकाश खंदारे, तत्कालीन शहर दक्षिणचे शिवशरणअण्णा बिराजदार पाटील, दक्षिण सोलापूरचे रतिकांत पाटील हे 1995 ते 2000 पर्यंत शिवसेना आमदार होते. यापैकी उत्तमप्रकाश खंदारे यांच्याकडे क्रीडा व शिक्षण विभागाचे राज्यमंत्रिपदही होते. वास्तविक मिळालेल्या या संधीच्या आधारे शिवसेनेची मजबूत बांधणी होणे गरजेचे होते. पण सेना काही मजबूत झाली नाही. उलट गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून एकमेव शहाजीबापू पाटील सेनेचे आमदार झाले. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेना सत्तेत आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण सेनेला काही बळ मिळाले नसल्याची तक्रार सुरूच होती. राष्ट्रवादीचे तत्कालीन पालकमंत्री, दिग्गज आमदारांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचाही सूर होता. पण तो 'मातोश्री'वर पोहोचत नसल्याची खंत शहाजीबापू, तानाजी सावंत यांनी बोलून दाखविली होती.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या दबलेल्या आवाजाला जणू वाटच मिळाल्याचा दावा सावंत, शहाजीबापू यांनी केला. अर्थात यातून ठाकरे यांनी पदाधिकारी बदलात पहिला दणका तानाजी सावंत यांना जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावरून हटवून दिला. त्यांच्याजागी मुंबईचे अनिल कोकीळ यांची नवे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली. पण त्याने गळती काही थांबली नाही. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. रश्मी बागल, दिग्विजय बागल यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. आषाढी एकादशीला शिंदे सोलापुरात येण्यापूर्वीच युवासेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महापालिकेतही सेनेला सुरुंग लागला. शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची धुरा प्रवेशापूर्वी खांद्यावर घेणारे ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे सत्ताबदल होताच शिंदे यांच्या स्वागताला पंढरपुरात धावले. त्यांच्या गटाचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश पाटील, माजी शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के यांनी तर थेट शिंदे गटात प्रवेश केला.

एवढ्यावर न थांबता आता शिंदे गटाकडून राज्यभरात सुरू असलेल्या तळागाळात शिवसेनेवर दावा सांगत शाखाप्रमुख, पदाधिकार्‍यांकडून वचननामा घेण्याचे काम आता सोलापुरात जोरात सुरू आहे. यासाठी तानाजी सावंत यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अशावेळी 'आम्ही उद्धव ठाकरेंसोबत' म्हणत पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे या चार जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली संपर्कप्रमुख कोकीळ यांनी उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची नव्याने बांधणी सुरू केली आहे. एकूणच आता एकीकडे शिवसेनेच्या कब्जासाठी दोन्हीकडून ताकद लावली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news