अबब..! सोलापुरात रोज 160 नव्या वाहनांची भर | पुढारी

अबब..! सोलापुरात रोज 160 नव्या वाहनांची भर

सोलापूर : अमोल व्यवहारे :  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने सोलापुरामध्ये खासगी वाहनांकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. मागील तीन महिन्यात रोज सरासरी 160 वाहनांची शहरातील अरुंद रस्त्यांवर भर पडत आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण 14 हजार 453 वाहनांची नोंद करण्यात आलेली आहे.

कोरोनापूर्व काळात अर्थात एप्रिल ते जून 2019 या कालावधीत सुमारे 9 हजार वाहनांची नोंद आरटीओमध्ये झाली होती. कोरोना लाट ओसरल्यावर प्रत्यक्ष कार्यालयीन पध्दतीने पुन्हा एकदा कामे सुरु झाली. मात्र, सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी खासगी वाहनांकडे सोलापूरकरांचा कल वाढल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते.

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर मनपाचा परिवहन उपक्रम डबघाईला आल्यामुळे या व्यवस्थेकडून शहरातील अनेक मार्गावर सुरु असलेल्या सिटी बसेस बंद झालेल्या आहेत. यामुळे उच्च मध्यमवर्गीय तसेच मध्यमवर्गीय खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.

सोलापूर आरटीओ कार्यालयाकडे गेल्या काही महिन्यांपासून सर्वात जास्त नव्या वाहनांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात सन 2021-22 या कालावधीत 45 हजार 526 वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये मार्च 2022 अखेर सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या ही 11 लाख 4 हजार 770 इतकी झाली. त्यामध्ये एप्रिल ते जून या कालावधीत 14 हजार 453 वाहनांची भर पडली आहे.

आता कोरोना ओसरल्यामुळे बहुतांशी खासगी आणि सरकारी कार्यालये, संस्था, कंपन्यामध्ये प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी वाहन संख्येत मोठी झाली आहे. वाहनसंख्येची मागणी वाढल्याने वाहन निर्मिती कंपन्यांकडेदेखील वाहन उपलब्ध करून देण्यासाठी प्रतीक्षा यादी वाढत असल्याचे आरटीओतील अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button