सोलापूर : जिल्ह्यात खासगी सावकारकी जोमात; शेतकरी कोमात | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यात खासगी सावकारकी जोमात; शेतकरी कोमात

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  खासगी सावकारकी मोडीत काढण्यासाठी सहकार खाते आणि पोलिस प्रशासन प्रयत्न करीत असले तरी गेल्या काही वर्षांत सावकाराच्या जाचाला कंटाळून 266 जणांनी दावे दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खासगी सावकारकी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

खासगी सावकाराविरुध्दचा कायदा आल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात 266 तक्रारदारांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दावा दाखल केला आहे. त्यापैकी निबंधकांनी जवळपास 108 दावे निकाली काढले आहेत. या निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये 57 शेतकर्‍यांच्या सावकारांच्या घशात गेलेल्या जमिनी परत करण्यात निबंधकांना यश मिळाले आहे. सध्या सहकार निबंधकांकडे 158 दावे सुरू आहेत.

मात्र या सुरू असलेल्या दाव्यांमधील प्रकरणात दोन्ही बाजूंचे वकील दिलेल्या तारखेला येत नाहीत. त्यामुळे दाव्यांचा निकाल लागण्यासाठी जवळपास दोन ते तीन वर्षे जात आहेत. त्यामुळे दावा दाखल करणार्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळण्यास विलंब लागत आहे.
दरम्यान, खासगी सावकारकी वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे शेतीमालाच्या दरातील घसरण आणि निसर्गाची साथ नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खासगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत. विशेष म्हणजे सावकारांनी दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी अनेक ठिकाणी दमदाटी करुन पैसे मागितले जात आहेत. तसेच शासनाने दिलेल्या व्याजाच्या आकारणीपेक्षा दुप्पट व्याज आकारणी करून शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत.

Back to top button