पंढरपुरात महाद्वार काला उत्साहात | पुढारी

पंढरपुरात महाद्वार काला उत्साहात

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : कुंकू, बुक्क्यासह लाह्यांची मुक्त उधळण करत गुरुवारी (दि.14) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाव्दार काला साजरा करण्यात आला. यानिमित्ताने परंपरेनुसार महाव्दार काल्याची दहिहंडी फोडण्याचा मान हा मदन महाराज हरिदास यांना आहे. सभामंडपात पाच प्रदक्षिणा घालून दहिहंडी फोडून महाव्दार काल्याचा नैवेद्य पादुकांना दाखवण्यात आला. त्यानुसार परंपरागत महाव्दार काल्याने आषाढी यात्रेची सांगता उत्साहात करण्यात आली.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात महाव्दार काला साजरा करण्यात येतो. गत वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंधात हा उत्सव साजरा झाला होता. मात्र, या वर्षी कोरोनानंर प्रथम निर्बंधमुक्तपणे महाव्दार काला साजरा करण्यात आला. या काल्याच्या कार्यक्रमास बहुसंख्य भाविक उपस्थित होते. संत नामदेव महाराज नामदास व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना 400 वर्षापूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्या होत्या, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून महाव्दार काला उत्सव साजरा केला जातो.

गुरुवारी परंपरेनुसार हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात सकाळी 11 वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज दिंडी घेवून दाखल झाले. यावेळी आरती होऊन शंभर फुटी पागोट्याने देवाच्या खडावा काल्याचे विद्यमान मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या होत्या. यानंतर हा सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभामंडप येथे पोहचला. तर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेवून मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहांडी फोडण्यात आली.

यावेळी उपस्थित भाविकांनी प्रसाद ग्रहन केला. यानंतर हा सोहळा महाव्दार घाट येथून चंद्रभागा नदी, कुंभार घाटावरुन, माहेश्‍वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली मार्गे हरिदास वेस व काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी हजारो भाविकांनी रस्त्यावर दर्शनासाठी गर्दी केली होती. जागोजागी कुंकू, बुक्का, लाह्यांची उधळण केली जात होती. उत्सवानंतर भाविकांना दही, लाड्यापासून बनविलेल्या काल्याचे वाटप करण्यात आले. गोपाळपूरच्या काल्यानंहतर महाव्दार काला होताच आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते. महाव्दार काल्याचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगीतले.

Back to top button