पावसाच्या उघडिपीमुळे उजनीत 64 हजार क्यूसेकचा विसर्ग | पुढारी

पावसाच्या उघडिपीमुळे उजनीत 64 हजार क्यूसेकचा विसर्ग

बेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे : चार दिवसांत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला होता. पुन्हा पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे गेले तीन चार दिवस उजनीत येणारा दौंडचा वाढलेला विसर्ग कमी झाला आहे. आज दुपारी 79 हजार क्यूसेक असणारा विसर्ग सायंकाळी सहा वाजेपर्यंत 64 हजार 716 वर आला आहे. विसर्ग कमी होत गेला. मात्र, शुक्रवारपासून पावसाने वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोर धरल्याने वरील 6 धरणांतून नदीद्वारे 19 हजार 544 क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत भीमा खोर्‍यातील अनेक धरणांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. पिंपळगाव जोगे 38, येडगाव 77, माणिकडोह 61, वडज 66, डिंभे 65, घोड 17, विसापूर 4, कलमोडी 103, चासकामान 87, भामा 86, वडिवले 154, आंध्रा 87, पवना 147, कासारसाई 70, मुळशी 159, टेमघर 132, वरसगाव 129, पानशेत 128 तर खडकवासला धरणावर 54 मि.मी. पावसाची नोंद आहे. त्यामुळे दौंड व बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यात होणार्‍या धुवाँधार पावसामुळे कलमोडी, आंध्रा, कासारसाई आणि खडकवासला ही धरणे 100 टक्केभरली आहेत. तसेच इतर धरणांची पाणी पातळी समाधानकारक असल्याने या धरणांमधून वडज 6 हजार 226, कलमोडी 1884, वडीवले 3 हजार 176, आंध्रा 1950 कासारसाई 1600 आणि खडकवासला 4 हजार 708 असा 19 हजार 544 क्यूसेकचा मोठा विसर्ग भीमा व भीमेच्या उपनद्यांमध्ये होत आहे. यामुळे बंडगार्डन 18 हजार 970 क्यूसेकचा विसर्ग तर दौंडमधून 64 हजार 716 उजनीत येत आहे. भीमाशंकर येथे होत असलेल्या पावसामुळे घोड व इंद्रायनी दुथडी भरुन वाहत असल्याने दौंडमधून हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. दरम्यान बंडगार्डन व दौंडमधून येणार्‍या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे.

गुंजवणी, वीर व नाझरे मधून निरेत पुन्हा विसर्ग सोडला आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नीरा खोर्‍यात असलेली धरणात भाटघर 40, नीरा देवधर 82, गुंजवणी 28, वीर 13, नाझरे 21 ही सर्व धरणे गेल्या आठवडयापासुन पडत असलेल्या दमदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण 100 टक्के भरले आहे. वीरमधून निरेत अद्यापर्यंत पाणी सोडले नाही.

दरम्यान निरापात्रातील सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने निरा नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. निरा-भिमा संगमाजवळ नरसिंगपूर येथे भिमा नदीत विसर्गपुन्हा वाढत चालला आहे. निरेचे पाणी भिमानदीत मिळाल्यानेस भिमा नदीसुध्दा दुथडी भरून वाहू लागणार आहे. त्यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागेत कमी झालेला विसर्ग वाढणार आहे. निरा खोर्‍यातील सर्वच धरणे भरल्यामुळे या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button