सांगोला : दुष्काळात पुरवठा केलेली पाणी बिले मिळेनात | पुढारी

सांगोला : दुष्काळात पुरवठा केलेली पाणी बिले मिळेनात

सांगोला; पुढारी वृत्तसेवा :   सांगोला तालुक्यात सन 2019-2020 मध्ये दुष्काळ परिस्थितीत नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, केलेल्या पाणीपुरवठ्याचे शासनाने अदा केलेले टँकरचे बिल ठेकेदाराने टँकर चालकांना दिले नाही. सुमारे 22 लाख रुपयांचे टँकरचे बिल अद्यापी मिळाले नाही, म्हणून सदर टँकर चालकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे ठेकेदाराकडून बिल अडवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे. तर बिले तत्काळ मिळावी, अशी मागणी टँकर चालकाकडून करण्यात आली आहे.

सन 2019 20 मध्ये सांगोला तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ परिस्थितीमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तालुक्यात टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. सदर पाणी पुरवठा करत असताना शासनाने दिलेल्या नियमावलीच्या अधीन राहून बबनराव शिंदे वाहतूक संस्था यांच्यामार्फत ठेकेदार नंदकुमार यादव यांच्या सांगण्यावरून दत्तात्रय मंडले यांनी कडलास व कडलास गावांतर्गत येणार्‍या वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 मार्च 2019 ते 10 ऑक्टोबर 2019 या कालावधीत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे. तर धोंडीराम (पिंटू) उबाळे यांनी सावे व राजापूर आणी त्या अंतर्गत येणार्‍या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना टँकरद्वारे 1 मार्च ते 9 ऑक्टोबर दरम्यान पाणी पुरवठा केला आहे.

पंचायत समिती प्रशासन व पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामपंचायतीच्या नियोजनानुसार तसेच ठेकेदारांनी दिलेल्या सूचनेवरून नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. यामध्ये कडलास या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दत्तात्रय मंडले यांचे टँकरचे सुमारे 9 लाख रुपये, तर धोंडीराम उबाळे यांच्या सावे आणि राजापूर गावासाठी वापरलेल्या टँकरचे 13 लाख रुपये असे एकूण 22 लाख रुपये ठेकेदाराकडून आज अखेर टँकर चालकांना अदा केले नाहीत. यामुळे टँकर चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

टँकरचे बिल मिळावे या संदर्भात ठेकेदारांना विचारणा केली असता त्यांनी वेगवेगळे कारणे सांगून उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे टँकर चालकांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, तसेच तहसिलदार अभिजीत पाटील यांच्याकडे तक्रार दिली आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या पाणीपुरवठ्याची बिले तत्काळ मिळावी अशी मागणी टँकर चालक दत्तात्रय मंडले व धोंडीराम उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टँकरची बिले शासनाने ठेकेदारांना दिली आहेत. मात्र ठेकेदारांनी सदरची बिले टँकर मालक यांना दिली नाहीत. सदर टँकर बिल मिळवण्यासाठी आम्ही ठेकेदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रशासनाकडे तक्रार केली आहे. यावर टँकरची बिले मिळावी ही आमची मागणी आहे.
दत्तात्रय मंडले,
टँकर मालक

Back to top button