सोलापूर : नाथांच्या स्वागतासाठी कौठाळीनगरी सज्ज | पुढारी

सोलापूर : नाथांच्या स्वागतासाठी कौठाळीनगरी सज्ज

कौठाळी; सोमा लोहार :  आषाढी वारी सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह अनेक भागांतून विविध संतांचे पालखी सोहळा निघाले आहेत. यामध्ये पैठण येथून निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कौठाळीनगरी सज्ज झाली आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षांपासून आषाढी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. संत एकनाथ महाराज यांचाही पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाला आहे. सर्व पालखी सोहळे पंढरपूरजवळ आले. वारकर्‍यांच्या सेवेसाठी पालखीमार्गावरील गावे संतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी होळे (ता. पंढरपूर) येथील मुक्काम आटोपून संत एकनाथ महाराज पालखी सोहळा नाथांच्या पादुकांना भीमा स्नानानंतर कौठाळी येथून मार्गस्थ होतो, तर साडे (ता. करमाळा) येथील संत बलभीम महाराज पालखी सोहळा मुक्कामी विसावतो.

या संतांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पालखीमार्गाची दुरुस्ती भीमा नदीवरील नाथसेतू पुलाजवळील स्वच्छता करुन भाविकांना भीमास्नान करता यावे, यासाठी सोय करण्यात आली आहे.गावांमधील रस्त्यांची स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, पालखीतील महिला-मातांसाठी हिरकणी कक्ष, वारीकाळात स्वच्छता राहावी यासाठी कचराकुंडी, स्वतंत्र शौचालय, पाणीपुरवठा आदी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या मार्गांवरुन पालख्या मार्गक्रमण करणार आहेत अशा ठिकाणी खड्ड्यांमध्ये मुरमीकरण करुन रस्त्यावरील काटेरी झुडपे तोडण्यात आली आहेत,अशी माहिती सरपंच शारदा अनिल नागटिळक, ग्रामसेविका सगुणा सरवदे यांनी दिली.
दोन वर्षांनंतर होणार्‍या आषाढी वारी सोहळ्यादरम्यान वैष्णवांची सेवा करण्यासाठी भाविकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

Back to top button