पंढरपुरात पावसाच्या सरी, भाविकांची धावपळ | पुढारी

पंढरपुरात पावसाच्या सरी, भाविकांची धावपळ

पंढरपूर;  पुढारी वृत्तसेवा :  आषाढी यात्रेकरिता दोन वर्षांनंतर प्रथमच संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात संताच्या पालख्यांनी प्रवेश करताच विठुरायाच्या नगरीत पंढरपूर शहर व तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावत भाविकांना ओलेचिंब केले. आषाढी यात्रेकरिता भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली आहे, तर मुख दर्शन घेण्यासाठीदेखील मंदिर परिसरात गर्दी आहे. मात्र, अचानक आलेल्या दमदार पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली.

जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या पेरण्यादेखील केल्या नाहीत. जमिनीची मशागत करुन शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आषाढी यात्रा सोहळा दोन वर्षांनंतर प्रथम निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने शेतकरी भाविक मोठ्या संख्येने संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. संताचे पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये उत्सुकता आहे.

जसजसे पालखी सोहळे पंढरपूरच्या जवळ येऊ लागल्याचे दिसत आहे, तसतसे भाविक पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेऊन संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई आदींसह विविध संतांच्या पालख्यांमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे श्री विठ्ठल मंदिर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट आदी भाविकांनी फुलले आहेत.

दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार होऊ लागले होते. दुपारी पावणेतीन वाजता हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. बघताबघता तीन वाजता दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे छोट्या-छोट्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. हे छोटे व्यावसायिक आषाढी यात्रेमुळे आपली दुकाने, स्टॉल उभारुन बसले आहेत. पावसामुळे रस्त्यावरुन पाणी वाहत होते. अचानक पाऊस आल्याने भाविकांनी जागा मिळेल तेथे आश्रय घेतला. दरम्यान, संतांच्या पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्या आणि पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात असून ‘जोरदार पाऊस पडू दे विठुराया’, अशी आर्त हाक देत आहेत.

Back to top button