सोलापूर : तुकोबारायांच्या मुक्‍कामासाठी बोरगावनगरी सज्ज | पुढारी

सोलापूर : तुकोबारायांच्या मुक्‍कामासाठी बोरगावनगरी सज्ज

श्रीपूर;  पुढारी वृत्तसेवा :  जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवार, 6 जुलै रोजी बोरगाव (माळशिरस) येथे सायंकाळी मुक्कामी येत आहे. पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी बोरगावनगरी सज्ज झाली आहे.

कोराना महामारीमुळे सलग दोन वषेर्र् संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ झानेश्‍वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा रद्द झाला होता व त्यांच्या पादुका आषाढी एकादशीसाठी एस.टी.ने पंढरपूरला आणल्या होत्या. तब्बल दोन वर्षांनी पायी पालखी सोहळा येत असल्याने स्थानिक नागरिक व वारकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

बोरगावमध्ये पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने बाजार पटांगणावर भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. कोणतीही रोगराई पसरू नये म्हणून अंडरग्राऊंड गटारी, गावातील स्वच्छता केली आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी केली आहे. रस्त्यावरील खांबांवर दिवाबत्तीची सोय केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक व पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत टी.सी.एल. पावडर टाकून पाणी निर्जंतुक केले आहे. ठिकठिकाणी महिलांसाठी हिरकणी कक्ष, कचरा व प्लास्टिक संकलन केंद्र, कोरोना चाचणी कक्ष व आरोग्य केंद्र वारकर्‍यांच्या सोयीसाठी उभारली आहेत.

पालखीमार्गावर ठिकठिकाणी ग्रामपंचायत व स्थानिक संस्थांच्या स्वागतकमानीही लावलेल्या आहेत. पालखीसोबत येणार्‍या लाखो भाविकांची सोय म्हणून नवीन पालखी स्थळांवर स्वच्छता व दिवाबत्तीची सोय केली आहे. नवीन पालखी स्थळांमुळे दिंडीतील वारकर्‍यांची उत्तम सोय झाली आहे. त्यामुळे बोरगाववर येणारा ताण कमी झाला आहे. एकंदरीत सर्व कामे झाल्यामुळे संत तुकाराम महाराज यांच्या स्वागतासाठी व मुक्कामासाठी बोरगावनगरी सज्ज झाली आहे.

Back to top button