सोलापूर : खुडूस येथे आज रंगणार माऊलींचे गोल रिंगण | पुढारी

सोलापूर : खुडूस येथे आज रंगणार माऊलींचे गोल रिंगण

पानीव;  विनोद बाबर :   संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा (पानीव फाटा), ता. माळशिरस येथे बुधवार, 6 जुलै रोजी सकाळी आठ वाजता होत असून या रिंगण सोहळ्याची व पालखी स्वागताची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक ठवरे यांनी दिली.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा सोहळा खंडित झाला होता. परंतु आता होणार्‍या सोहळ्याकडे सर्व भाविकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण शेकडो वर्षांपासून येथील ज्योतीराम वाघ व जयवंत सिद यांच्या शेतात होत असते. हा रिंगण सोहळा व पालखी सोहळा पंचक्रोशीतील परिसरासह भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत असतो.

सोहळ्याची तयारी खुडूस ग्रामपंचायतीकडून करण्यात येते. भाविकांचे स्वागत, भोजनाची मेजवानी पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत असतात. रिंगण सोहळ्याचे मैदान तयार करणे, रिंगण व्यवस्थित पाहता यावे यासाठी आजूबाजूचे मैदान तयार करणे, स्वागत कमानी उभारणे, स्वयंसेवकांची नेमणूक, दिवाबत्तीची व्यवस्था करणे आदींसह पाणी शुद्धीकरण करणे, फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणी करणे, नाले व गटार स्वच्छता व परिसर स्वच्छता करणे, स्ट्रिटलाईट दुरुस्ती व दिवाबत्तीची व्यवस्था करणे आदी कामे पूर्ण आहेत.

या सोहळ्याची तयारी खुडूस ग्रामपंचायतीचे पदाधिकारी करीत असून विविध खात्यांतील अधिकारी व कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सोबत घेऊन तयारी करीत आहेत. हा सोहळा उत्साहात व यशस्वी करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, युवक व ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान असते, अशी माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक ठवरे, ग्रामविकास अधिकारी सत्यवान पवार यांनी दिली.

Back to top button