संतश्रेष्ठ ज्ञानोबांच्या पालखीमुळे गुरुवारी माळशिरस दुमदुमणार | पुढारी

संतश्रेष्ठ ज्ञानोबांच्या पालखीमुळे गुरुवारी माळशिरस दुमदुमणार

माळशिरस : अनंत दोशी : तब्बल दोन वर्षानंतर गुरुवारी (दि. 5) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शहरांत मुक्कामाला येत आहे. दोन वर्षानंतर माऊलींची भेट होणार असल्याने तसेच पालखी सोहळ्यातील वैष्णवांची सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचे शहरवासीयांत समाधान आहे. माळशिरस शहरांत कुठलीही मोठी यात्रा नसते. त्यामुळे वर्षातून एकदा येणार्‍या पालखी सोहळा हाच यात्रे सारखा मोठा उत्सव आहे. त्यामुळे शहरातील नागरिक या पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात. बाहेरगांवी नोकरी व्यावसायामुळे स्थायिक झालेले नागरिक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आवर्जून माळशिरस येथे येतात. शहरांत पालखी सोहळा दाखल होताना माळशिरस तहसील व पंचायत समिती, नगरपंचायतीकडून स्वागत करण्यात येते.

पालखी सोहळ्यामुळे शहरातील अनेक व्यावसाईकांना चांगले उत्पन्न मिळते. दोन वर्षा नंतर पालखी सोहळा शहरात येत असल्याने व्यावसाईक ही आनंदात असून यंदा सोहळ्या बरोबर वारकर्‍यांची दिंड्याची संख्या जास्त असल्याने व्यवसायही चांगला होणार अशी अशा त्यांना आहे. पालखी सोहळा मुक्कामाच्या दिवशी माळशिरस परीसरांत असलेल्या वाड्यावस्त्यांसह शहरातील नागरिक माऊलींच्या दर्शनासाठी सकुटुंब येत असतात. दर्शनानंतर महीला, लहान मुले, तरुण खरेदीचा पाळण्यात बसण्यासह इतर मनोरंजनाच्या साधनाचा आनंद घेतात. त्यामुळे हा पालखी सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या भक्तीचा समाधानाचा आनंद व्दिगुणीत करणारा असतो. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थही अकलूजमध्ये येतात. त्यामाध्यमातून व्यापर मोठ्याप्रमाणावर होत असतो. यानिमित्ताने गावोगावचे व्यापारी, किरकोळ विक्रेते, हॉटेल चालक तातपुरत्या स्वरूपात आपला व्यवसाय पालखी तळाच्या परिसरात करत असतात. यामुळे वारकर्‍यांची सोय होते तशी व्यापार्‍यांचीही आर्थिक कमाई होते. यामुळे पालखी सोहळा सर्वांसाठीच उत्साहाचा व हवाहवासा ठरतो.

बँड लाऊन होणार पालखीचे स्वागत
पालखी सोहळ्यास स्थानिक बॅन्ड पथकाच्या वतीने वाजत गाजत पालखी मुक्कामाच्या तळापर्यंत नेले जाते. पालखी सोहळा ज्या दिवशी मुक्कामासाठी शहरांत येतो. त्या दिवशी सोहळ्या बरोबर आलेल्या वारकर्‍यांना प्रत्येक कुटुंब अन्नादान करते. शहरांत ठिकठिकाणी वारकर्‍यासाठी चहा नाष्टाची सोय अनेक सामाजीक संस्था, तरुण मंडळे करतात. यंदा वारकर्‍यांना अन्नदान करता येणार असल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे.

Back to top button