सोलापूर : स्मार्ट सिटीत महिला स्वच्छतागृहांचा अभाव | पुढारी

सोलापूर : स्मार्ट सिटीत महिला स्वच्छतागृहांचा अभाव

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर शहराची लोकसंख्या ही जवळपास 12 लाखांपर्यंत आहे. यामधील निम्मी लोकसंख्या ही महिलांची आहे. असे असले तरी स्मार्ट सिटी सोलापूर शहरात महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी एकही स्वच्छतागृह वा प्रसाधनगृह नाही. या मूलभूत सुविधांचीच ओरड असल्याने महिलांची गैरसोय होत आहे.

सोलापूर शहराची वाढ होत असताना महापालिकेकडून महिलांसाठीचे स्वच्छतागृह करण्याकडे दुर्लक्ष झालेे आहे. कामासाठी, खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या महिलांची संख्याही जास्त आहे. परंतु, शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. भाजी विक्री व इतर वस्तू विक्रीचा व्यवसाय करणार्‍या महिला, पोलिस, समाजसेविका, गवंडीकाम, मजूरकाम करणार्‍या महिला, कार्यकर्त्या आदी महिलांना अशाप्रकारे सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिला पोलिसांसाठी तर अशा सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि इतर ठिकाणी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतागृहे ठेकेदारी पध्दतीने चालविली जातात. परंतु, बहुतांश ठेकेदार या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या स्वच्छतागृहात जाण्यास महिला टाळाटाळ करतात.

सोलापूर शहरातील अनेक ठिकाणच्या पुरुषांसाठीच्या मुतारी अथवा स्वच्छतागृहेही गायब झाली असून त्याठिकाणी राजकीय लोकांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यवसाय थाटले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील अनेक ठिकाणी पैसे मोजून स्वच्छतागृहात जाण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. परंतु, या ठिकाणी कोणीही पैसे मोजून लघुशंकेसाठी जात नाही. उलट त्याच्या शेजारीच लोकांनी उघड्यावरच मुतारी सुरू केल्याचे दिसून येते. याकडे पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असून सोलापूर शहरात किती स्वच्छतागृहे, शौचालये, मुतारी आहेत याची संख्याच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय व्यक्तींबरोबरच पालिका पदाधिकारी व प्रशासन हे मुतारी, स्वच्छतागृहांच्या प्रश्‍नांवर मूग गिळून गप्प असल्याचे दिसते.

आरोग्यावर विपरीत परिणाम
घराबाहेर पडल्यानंतर महिलांसाठी सुरक्षित मुतारी अथवा स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने महिलांना कार्यालय वा घरी जाईपर्यंत उत्सर्जन विधी रोखून ठेवावे लागतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. मूत्रविसर्जन रोखल्यास मूत्रपिंडाचे विकार उद्भवतात. लैंगिक आजार, त्वचा विकार, पोटदुखी संभवते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button