सोलापूर : वडकबाळमधील खून प्रकरणी महिलेस अटक | पुढारी

सोलापूर : वडकबाळमधील खून प्रकरणी महिलेस अटक

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  वडकबाळ तांड्यावर राहणारा संजय भुताळी पुजारी (वय 39 रा. नाईक नगर तांडा, वडकबाळ ता.दक्षिण सोलापूर) याच्या खूनप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी भाग्यश्री महादेव भुई (वय 35 रा. नाईक नगर तांडा, वडकबाळ) या महिलेला अटक केली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ तांड्यावर राहणारा संजय भुताळी व गावातील महिला भाग्यश्री भुई यांच्यात भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेले. यानंतर बुधवारी रात्री एका अज्ञात व्यक्‍तीने संजय भुताळी याच्या डोक्यात व कानावर लाकडाने जोरात मारले. व त्यानंतर दोरीने संजय याचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले होते. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय अधिकारी अमोल भारती मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व जागेवरच पंचनामा केला.

या प्रकरणी मृताचा भाऊ कन्नप्पा भुताळी पुजारी याने मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. व संशयीत आरोपी म्हणून भाग्यश्री भुई या महिलेस अटक केली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या खून प्रकरणाबाबत लवकरच छडा लावण्यात येईल, असे सपोनि नितीन थेटे यांनी सांगितले.

Back to top button