सोलापूर : अक्‍कलकोटमध्ये स्वच्छतामोहीम राबविण्याची मागणी | पुढारी

सोलापूर : अक्‍कलकोटमध्ये स्वच्छतामोहीम राबविण्याची मागणी

अक्कलकोट , पुढारी वृत्तसेवा : एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरपरिषदेने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी स्वामीभक्तांतून होत आहे. सध्या आषाढी एकादशी वारीनिमित्त राज्यासह परराज्यांतील भाविक देवदर्शनाकरिता बाहेर पडतात. दरम्यान, विविध देवांच्या दर्शनानंतर आषाढीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.
राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटची ख्याती आहे. गुरुपौर्णिमा उत्सव असतो. यानिमित्त भाविकांची संख्या लक्षणीय असते. याच दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन असतो. यानिमित्त न्यासाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.
अक्कलकोट नगरपरिषदेने स्वामी भक्तांच्या सोयीकरिता स्वच्छता मोहिमेबरोबरच स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दिवाबत्ती, कीटकनाशकांची फवारणी, रस्त्यांची डागडुजी आदी सोयींबरोबरच पालखीमार्गांवरील स्वच्छता याकडेदेखील विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडे जाण्यासाठी अरुंद रस्ता याबरोबरच परिसरातील अतिक्रमणामुळे स्वामी भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी नगरपरिषदेने घ्यावी. प्रचंड गर्दीमुळे गुदमरण्याचा प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नगरपरिषदेला राज्य शासनाकडून स्कायवॉक करण्याबाबतचे आदेश धाडलेले असताना तत्कालीन पदाधिकार्‍यांनी न.पा. सभेत याबाबतचा ठराव नामंजूर करण्यात आला.

भविष्यकालीन निर्माण होणार्‍या अडचणीस कोण जबाबदार, असा प्रश्‍न निर्माण होत असला तरी नगरपरिषदेच्या हद्दीत असल्याने याबाबत सध्याच्या प्रशासनाने याकामी लक्ष देण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे. याबरोबरच पोलिसयंत्रणेमध्ये वाहतूक विभागासह विविध पथके तैनात करण्यात यावीय. या सर्व प्रकरणी विभागीय आयुक्त पुणे, जिल्हा अधिकारी सोलापूर, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी स्वामी भक्त व शहरवासीयांतून होत आहे. शहरातील नागरिकांनीही स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

 

Back to top button