सोलापूर : बोअरवेलमध्ये पडलेल्या घोरपडीस जीवदान | पुढारी

सोलापूर : बोअरवेलमध्ये पडलेल्या घोरपडीस जीवदान

सोलापूर , पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण सोलापूरमधील धोत्री परिसरातून चेन्नई-सुरत महामार्गाची मोजणी चालू होती. त्यामध्ये त्या महामार्गात येणार्‍या झाडांची मोजणी करण्यासाठी वन विभाग सोलापूर यांच्या वतीने सर्व्हे चालू होता. वन विभागाचे वनरक्षक अनिता शिंदे, बापूराव भोई, वनसेवक आदित्य शिंदे, बसवराज हिरोळे, सचिन साळुंखे हे त्याठिकाणी झाडांची मोजणी करत असताना त्यांना त्यांच्या बाजूला असलेल्या बोअरवेलमध्ये पाण्याचा सळसळ आवाज आला. ते सर्वजण त्या बोअरवेलजवळ गेले असता पाण्यात काहीतरी असल्याचे दिसून आले. व्यवस्थित पाहणी केली असता त्या बोअरवेलमध्ये एक घोरपड पडली असल्याचे दिसून आले.

स्थानिक शेतकर्‍यांनी त्या बोअरवेलमध्ये पडलेल्या घोरपडीस बाहेर काढण्याचे प्रयत्न केलेले होते, परंतु त्यांनादेखील यश आले नव्हते. जवळपास चार ते पाच दिवस त्यांनी प्रयत्न केले. पण, त्यांना यश आले नाही. त्या बोअरवेलचा अंदाज घेतला व एका लांब दोरीला एक मासे पकडायचे जाळे बांधले व त्या जाळ्याला एक दगड बांधून त्या बोअरवेलमध्ये सोडण्यात आले. दोन वेळा सदस्यांनी त्या बोअरवेलमध्ये ती जाळी सोडली. परंतु, त्या जाळीत घोरपडीला घेण्याचा प्रयत्न अयशस्वी होत होता. शेवटच्या प्रयत्नांत बोअरवेलमधील घोरपड जाळीच्या वरच्या बाजूस आली. क्षणाचाही विलंब न करता सुरेश क्षीरसागर यांनी टाँगच्या मदतीने त्या घोरपडीस अडकवले. अडकलेल्या घोरपडीस हळूहळू बोअरवेलमधून वरती घेऊन बाहेर काढण्यात यश आले.

अनेकठिकाणी बोअरवेल उघड्या अवस्थेत दिसून येतात. त्या उघड्या बोअरवेलमध्ये लहान मुले खेळतखेळत पडल्याचे आपण खूपवेळा ऐकले असेल. परंतु कुठलातरी प्राणी बोअरवेलमध्ये पडला असलेली ही घटना पहिल्यांदाच घडलेली दिसली.
बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढलेल्या घोरपडीस वन विभागाच्या मदतीने जवळच असलेल्या वन विभागाच्या अधिकृत जागेत सुखरूप सोडून देण्यात आले. यावेळी वनरक्षक अनिता शिंदे, बापूराव भोई, वनसेवक आदित्य शिंदे, बसवराज हिरोळे, सचिन साळुंखे तसेच सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे आणि प्रवीण गावडे आदी उपस्थित होते.

Back to top button