सोलापूर : महापालिका शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण लवकरच निश्‍चित | पुढारी

सोलापूर : महापालिका शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण लवकरच निश्‍चित

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या गेल्या बारा वर्षांपासून न झाल्याच्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी शिक्षकांच्या सेवेसंदर्भात मुख्याध्यापकांकडून माहिती मागविली आहे. यानंतर लवकरच शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण निश्‍चित होणार आहे.

शिक्षण मंडळांतर्गत शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या गेल्या बारा वर्षांपासून झाल्याच नाहीत. अनेक शिक्षक नियुक्ती झाल्यापासून दहा – दहा वर्षे एकाच शाळेत तळ ठोकून असल्याचे दिसून येते. यामुळे पालिका शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याचे धोरण निश्‍चित करण्याची गरज आहे. यासंदर्भातील वृत्ताची दखल प्रभारी प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी घेतली आहे. त्यांनी महापालिका शाळांमधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या एकूण 58 शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये 211 शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेतील सर्व शिक्षकांची सेवेसंदर्भातील माहिती शिक्षण मंडळाकडे पाठवायची आहे. शाळेतील कार्यरत शिक्षकाचे नाव, मूळ नियुक्ती दिनांक, सध्या शाळेत रुजू दिनांक, सध्या शाळेत एकूण सेवा, शिक्षकांचे मोबाईल नंबर ही माहिती एका तक्त्यामध्ये भरून सर्व मुख्याध्यापकांनी प्रशासनाधिकारी यांच्याकडे पाठवावयाची आहे. या माहितीआधारे बदल्यांचे धोरण निश्‍चित करण्यात येणार आहे. यावर्षी महापालिका शाळांचा विद्यार्थी पटही 302 ने वाढला आहे. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे जावीर यांनी स्पष्ट केले.

Back to top button