सोलापूर : मिनी मंत्रालयास येणार ‘अच्छे दिन’ | पुढारी

सोलापूर : मिनी मंत्रालयास येणार ‘अच्छे दिन’

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा :  मंत्रालयावर भाजप व बंडखोर शिवसेनेच्यावतीने सत्ता स्थापन करण्यात येत आहे. याचे पडसाद आगामी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीवर उमटणार आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपला ‘अच्छे दिन’ येतील, असा अंदाज राजकीय क्षेत्रातून व्यक्‍त होत आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरात मंत्रिपदावर सोलापूरची देशमुखी निश्‍चित आहे. याशिवाय भाजपच्या नव्या आमदारांनाही चांगले राजकीय बळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता काबीज करणे सोयीस्कर ठरत आहे.

भाजपचे आ. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख या दोघांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. दोघांपैकी एकाला मंत्रिपदाची देशमुखी फिक्स आहे. कदाचित दोघांनाही मंत्रिपद मिळेल, अशीही शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद निर्माण केलेल्या आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे. जरी मंत्रिपद त्यांना मिळाले नाही, तरी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे पुन्हा पालकमंत्रिपदाची देशमुखी येण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये समन्यव साधून जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता काबीज करण्यासाठी ते यशस्वी ठरतील, अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांत आहे. भाजपचे प्रबळ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना यासाठी हिरवा कंदील मिळाला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी विजयकुमार देशमुख यांचे संयमी नेतृत्व भाजपसाठी फलदायी ठरणार आहे.

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष असूनही उघडपणे भाजपचे समर्थक आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बार्शी तालुक्यात ‘कमळ’ अधिक फुलण्यास पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जरी राष्ट्रवादीत घरोबा केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे असणारे मैत्रीचे संबंध जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपसाठी फलदायी ठरण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघात आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी बहुसंख्येने निवडून जातील, असा अंदाज आहे. मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.

पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत आ. समाधान आवताडे, प्रशांत परिचारक गटातून भाजप सदस्यांची जिल्हा परिषदेवर मुसंडी मारण्याचा अंदाज आहे. सांगोला तालुक्यात शिवसेनेचे बंडखोर आ. शहाजीबापू पाटील यांची क्रेझ वाढल्याने आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या गटातील सदस्यांची संख्याही जिल्हा परिषदेत वाढण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांत जिल्हा परिषदेत सत्ता शाबूत ठेवण्यात भाजपला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या जास्त असतानाही भाजपने सत्ता काबीज करण्याची किमया दाखवून दिली होती. आगामी निवडणुकीत भाजपच्या सहा आमदारांच्या बळावर व राज्यात झालेल्या सत्तांतराच्या प्रेरणेने सोलापूर मिनी मंत्रालयात पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल, अशीच परिस्थिती आता स्पष्ट होत आहे.
संतोष आचलारे

Back to top button