पंढरपुरात आषाढी यात्रेच्या तयारीची लगबग | पुढारी

पंढरपुरात आषाढी यात्रेच्या तयारीची लगबग

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 10 जुलै रोजी साजरा होत आहे. याकरिता संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. त्यामुळे पालख्यांबरोबर येणार्‍या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पंढरपूर नगरपरिषद कामाला लागले आहे. शहरासह पालखी मार्गावरील स्वच्छता, चेंबूरची दुरुस्ती तसेच अतिक्रमण हटवण्यात येत आहे. तर शहरांतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत.

कोरोनानंतर दोन वर्षांनी आषाढी यात्रा निर्बंधमुक्तपणे साजरी होत आहे. त्यामुळे या यात्रेला 20 लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने कामे उरकण्यावर भर दिला आहे. शहरातील जुन्या व पडक्या वाड्यांवर सदर इमारत धोकादायक असल्याच्या सूचना लिहिण्यात आलेल्या आहेत. या सूचनांमुळे भाविकांना सतर्कता बाळगणे सायीचे ठरत आहे.

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून दररोज 80 टन कचरा उचलण्याचे काम करण्यात येत आहे. रस्ते झाडून चकाचक ठेवण्यात येत आहेत. तर गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारींची, चेंबरची दुरुस्ती करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यांवरील वाढलेल्या चंबरची उंची कमी करणयात येत असून यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर होत आहेत.

आषाढी यात्रेच्या अगोदर शहरातील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. भाविकांना अडथळे ठरतील, अशा टपर्‍या, हातगाडे हटवण्यात येत आहेत. तर सीमारेषा आखून देवूनही दुकानदारांनी अतिक्रमण करत दुकाने वाढवलेली आहेत. अशा दुकानांवरही अतिक्रमण कारवाई करत अतिक्रमण हटवले जात आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्यांनी धसका घेतला असून कारवाई होण्याअगोदरच स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. मात्र जे अतिक्रमण काढून घेत नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात आहे.

आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याकरीता भाविकांना अडथळे ठरणारे अतिक्रमण हटवण्यात येत आहे. अतिक्रमण केलेल्या दुकानदारांनी, फेरीवाल्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल.
– सुनील वाळूजकर
उपमुख्याधिकारी

Back to top button