रुक्मिणी मातेच्या चरणांवर उद्या वज्रलेप | पुढारी

रुक्मिणी मातेच्या चरणांवर उद्या वज्रलेप

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची झीज होत असल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाकडून रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्याने त्यावर दि. 11 जून रोजी सायंकाळी वज्रलेप करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनीं दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची झीज होत असल्याचे पाहणीतून समोर आल्याने मंदिर समितीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाला पाचारण केले होते. पुरातत्त्व विभागाच्या अहवालानुसार श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे, तर रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाली असून, मूर्ती सुरक्षित आहे. त्यामुळे केवळ रुक्मिणी मातेच्या चरणांवर वज्रलेप करण्याची सूचना केली होती.

कोरोनानंतर प्रथम श्रींचे चरणस्पर्श दर्शन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर समितीकडून सुरू करण्यात आले. याच दिवशी भाविकाला रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्याचे लक्षात आले. याची माहिती मंदिर समितीला मिळताच मंदिर समितीने भारतीय पुरातत्त्व विभागाला दि. 7 व 8 रोजी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पाचारण केले होते. पुरातत्त्व विभाग औरंगाबादच्या टीमने मूर्तींची पाहणी करुन दि. 10 मे रोजी मंदिर समितीला पत्रान्वये अहवाल दिला होता. या अहवालात श्री विठ्ठलाची मूर्ती सुस्थितीत आहे. मात्र रुक्मिणी मातेच्या मुर्तीच्या पायाची झिज झालेली आहे.

रुक्मिणी मातेचे पाय वगळता मुर्तीची इतर कोणत्याही भागाची झिज झालेली नाही. मुर्ती सुस्थितीत आहे. केवळ रुक्मिणी मातेच्या पायावरच वज्रलेप करण्यात यावा, असा अहवाल दिला होता. त्यानुसार मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव व मंदिर समिती सदस्य यांनी बैठकीत आषाढी यात्रापुर्वी वज्रलेप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार शनिवार दि. 11 जून रोजी उपअधिक्षक, पुरातत्व रसायन, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विज्ञान शाखा, औरंगाबाद विभाग, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा औरंगाबाद यांच्या मार्फत वज्रलेप करण्यात येणार आहे. वज्रलेप सायंकाळी करण्यात येणार आहे. मात्र, या वज्रलेप संवर्धन काळात श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु राहणार आहेत. आषाढी यात्रेपुर्वीच वज्रलेप करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

आषाढी यात्रेपूर्वी व औरंगाबाद प्रयोग शाळेमार्फत होणार वज्रलेप

भाविकांतून समाधान

Back to top button