एकाच दिवसात 72 स्कूलबसची तपासणी | पुढारी

एकाच दिवसात 72 स्कूलबसची तपासणी

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  कोरोना, लॉकडाऊन व निर्बंधाच्या कालावधीनंतर लवकरच शाळा या पूर्ण वेळ सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्कूल बस तपासणीला आरटीओ कार्यालयात वेग आला आहे. सोमवारी एका दिवसामध्ये 72 स्कूल बसची तपासणी करण्यात आली. आणखी काही दिवस ही स्कूल बस तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजयसिंह गवारे यांनी दिली.

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सुमारे 600 स्कूल बसची नोंदणी आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोराना लॉकडाऊन व निर्बंधामुळे शाळा या पूर्ण वेळ व निर्बंधामध्ये सुरू होत्या. त्यामुळे स्कूल बसच्या फिटनेसची तपासणी करण्यात आलेली नव्हती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्याने लवकरच शाळा या पूर्णपणे व पूर्णवेळ सुरु होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर सोलापुरमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूल बसची फिटनेस तपासणी करण्याचे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत स्कूल बस चालक-मालक संघटनेने संघटनेचे सभासद असलेल्या स्कूल बसच्या तपासणीसाठी सोमवारी एकाच दिवशी आरटीओ कार्यालयात गर्दी केली होती.

दररोज 15 स्कूल बस तपासणीसाठीचा कोटा ठरवून देण्यात आलेला आहे. परंतु, हा कोटा वाढवून 70 पर्यंत नेण्यात आला. त्यापेक्षाही जास्त स्कूल बसची तपासणी यावेळी करण्यात आली आहे. स्कूल बस तपासणीची ही मोहीम अशीच पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले.

स्कूल बसचे फिटनेस तपासताना लाईट (अप्पर व डिप्पर), ब्रेक, इंडिकेटर, चालकाची केबीन, रिव्हर्स, वायपर, हॉर्न अशा बाबी तपासल्या जातात. याबाबीमध्ये कमतरता किंवा बंद आढल्यास ते वाहन अनफिट केले जाते. दररोजचा स्कूल बस तपासणीचा कोटा वाढवून दिला आहे. परंतु, शाळा सुरू होणार असल्यामुळे प्राधान्याने स्कूल बस चे फिटनेस तपासण्यात येत आहे.
– अजयसिंग गवारे,
सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर. 

Back to top button