सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पाण्याविषयक तक्रारींचे निरसन करण्यासाठी महापालिकेने सुरु केलेल्या वॉटर ऑडिटचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने अनधिकृत नळ व बांधकामांचा छडा लागला आहे. यासंदर्भात कारवाईचे काम सुरु आहे.
पाणी हा सोलापूर शहराचा कळीचा मुद्दा बनला आहे. कोणत्यातरी कारणाने पाणीपुरवठा विस्कळीत होणे, हे नित्याचेच झाले आहे. शहराच्या अनेक भागांत गरजेपेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो, तर दुसर्या भागात पुरेसे पाणी दिले जात नाही. ही विसंगती वर्षानुवर्षे कायम आहे. सध्या महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुधारण्यासाठी समांतर जलवाहिनी, स्काडा प्रणाली आदी योजनांचे काम सुरू आहे. ज्या भागात कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होतो अशा नगरांची माहिती संकलनाचे काम वॉटर ऑडिटच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे भावी काळात शहरवासीयांची पाण्याची अडचण दूर होणार आहे.
स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर शहराचा कायापालट होत आहे. स्मार्ट रोड, स्मार्ट चौक, एबीडी एरियात नव्याने रस्ते, जल-ड्रेनेजलाईन, भूमिगत विजेचे व अन्य केबल आदींमुळे स्मार्ट सिटीचे दृष्यपरिणाम दिसत आहेत. या सर्व बाबी स्वागतार्ह असल्यातरी शहराची पाण्याची समस्या कायम आहे. नजीकच्या काळात ही समस्या बहुतांश प्रमाणात सोडविण्यात यश मिळण्याची आशा दिसते आहे.
'या' माहितीचे होतेय संकलन
वॉटर ऑडिटच्या कामाला सप्टेंबर 2021 पासून सुरुवात झाली. याअंतर्गत महापालिकेचे 100 कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलन करीत आहेत. या मोहिमेत पाणीपुरवठा किती तास, कुठल्या वेळेत होतो, पाणीपुरवठा स्वच्छ की अस्वच्छ, प्रत्येक घरातील पाण्याची साठवण कशा पद्धतीने आहे, पाण्यासाठी विजेचा खर्च किती होतो आदी माहिती घेतली जात आहे.या ऑडिटद्वारे शहराला पाण्याची किती गरज आहे व प्रत्यक्षात किती पुरवठा होतो याची उकल होणार आहे.
या बाबींचाही छडा लागतोय
या मोहिमेला वॉटर ऑडिट असे नाव असले तरी यानिमित्ताने महापालिका शहरातील मिळकतींची संपूर्ण माहिती घेत आहे. नळ कनेक्शन अधिकृत की अनधिकृत, मिळकतीची महापालिकेकडे नोंद आहे का, बांधकाम तसेच वापर परवाना आहे का, आदी माहिती संकलित केली जात आहे. यामुळे बोगस नळ, अनधिकृत बांधकामांचा छडा लागून महापालिकेला महसूल वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
वॉटर ऑडिटअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 90 हजार 823 मिळकतींचा सर्व्हे झाले आहे. या कामाचे प्रमाण जवळपास 90 टक्के आहे. उर्वरित काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होणार, असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले.
निवडणुकीच्या कामामुळे मोहिमेला लागणार ब्रेक
वॉटर ऑडिटचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याने उर्वरित काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असतानाच कर विभागाच्या कर्मचार्यांना मनपा निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे तसेच ओबीसी, नॉन ओबीसी मतदारांची आकडेवारी गोळा करण्याचे काम सोपविण्यात आहे. त्यामुळे या मोहिमेला ब्रेक लागणार आहे.
वॉटर ऑडिटचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. या मोहिमेत अनधिकृत नळांचा छडा लागत आहे. यासंदर्भात कारवाई करण्याचे काम विभागीय कार्यालयांच्या (झोन) माध्यमातून सुरू आहे.
– श्रीराम पवार
सहायक आयुक्त, महापालिका