सोलापूर : लक्ष्मी बँकेला सहकार खात्याचा दिलासा | पुढारी

सोलापूर : लक्ष्मी बँकेला सहकार खात्याचा दिलासा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने महत्त्वाकांक्षी निर्णय घेत एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. सोलापूर शहरातील हजारो खातेदारांच्या जिव्हाळ्याची बँक असणार्‍या दि लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेतही हि योजना लागू करण्यात आली आहे.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी बँकेच्या 18 मे 2022 रोजीच्या पत्राच्या अनुषंगानेे एकरकमी कर्ज परतफेड योजना मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता.त्याला शासनाने आता मंजुरी दिली आहे. यासाठी 31 मार्च 2021 अखेर जी कर्जखाती संशयित अथवा बुडित वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा सर्व खातेदारांना ही योजना लागू होणार आहे. 31 मार्च 2021 अखेर कर्जाच्या सब स्टँडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडित वर्गवारीत गेलेल्या कर्जखात्यांनादेखील ही योजना लागू होणार आहे. 31 मार्चपूर्वी अनुत्पादक झालेल्या कर्जदारांना यापुढे एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेण्यासाठीची ही शेवटची संधी असणार आहे.

फसवणूक, गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणीवपूर्वक थकवलेली कर्जे यासाठी पात्र राहणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करून वितरित केलेली कर्जे, आजी-माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणार्‍या भागीदारी संस्था, कंपन्या, संस्था यांना दिलेल्या कर्जाच्या अथवा त्याची जामीनकी असणार्‍या कर्जांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ही सवलत घेता येणार नाही.

संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिलेल्या कर्जासाठी अथवा ते जामीनदार व असलेल्या कर्जांना ही योजना लागू राहणार नाही. कुटुंब म्हणजे पत्नी, पती, वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून यांना याचा लाभ मिळणार नाही. पगारदार मालकांशी जर पगार कपातीचा करार झाला असेल, तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जासाठी ही योजना लागू राहणार नाही. शासकीय हमी असणार्‍या कर्जांना ही सवलत मिळणार नाही. 10 कोटींवर कर्ज असणार्‍या कर्जदारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी निबंधकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

या योजनेच्या अमंलबजावणीसाठी एनपीए कर्जदाराने अर्ज हा 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत बँकेकडे सादर केलेला असणे अपेक्षित आहे. एनपीए कर्जदाराने या अर्जासोबत कर्जखाते ज्यादिवशी एनपीए झालेले आहे त्यादिवशीच्या एकूण बाकीच्या 5 टक्के रक्कम अर्जासोबत जमा करावी लागेल. दि लक्ष्मी को- ऑप. बँक लि; सोलापूर एकरकमी कर्ज परतफेड योजना अंतर्गत अर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एका महिन्याच्या आत तडजोडीची सर्व रक्कम बँकेत भरणे आवश्यक असणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त कर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कर्जदार, ठेवीदारांनाही फायदा

लक्ष्मी बँकेचा सध्या एनपीए वाढला आहे. दुसरीकडे ठेवीदारांनी ठेवी परत घेण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे कर्जाची तत्काळ परतफेड व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा कर्जदारांनाही फायदा होणार आहे. ठेवीदारांच्याही ठेवी आता वेळेत परत मिळणार आहेत.

Back to top button