सोलापूर : ‘त्या’ निर्णयास आयुक्‍तांनी दिली तूर्त स्थगिती | पुढारी

सोलापूर : ‘त्या’ निर्णयास आयुक्‍तांनी दिली तूर्त स्थगिती

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  अक्‍कलकोट रोड एमआयडीसी मधील वृक्षतोड संदर्भात संबंधित व्यक्‍तीला 1200 झाडे देण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती दिल्याचे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सांगितले. या प्रश्‍नी दै. ‘पुढारी’ने खास वृत्त देऊन लक्ष वेधले होते.

वृक्षतोड करणार्‍या व्यक्‍तीविरोधात मनपाने फौजदारी कारवाई केली असताना देखील दुसरीकडे 120 झाडे तोडल्याच्या मोबदल्यात 1200 झाडे देण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीने घेतला होता. या निर्णयात विसंगती असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यासंदर्भात आयुक्‍तांचे लक्ष वेधले असता त्यांनी या निर्णयाला तूर्त स्थगिती दिल्याचे सांगितले.

कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

महापालिकेच्या उद्यानांच्या दुरवस्थेबाबत दै. ‘पुढारी’त आलेल्या वृत्ताची मनपाचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. शहरात एकूण 44 उद्याने असून यातील अनेक उद्यानांची दुरवस्था आहे. संरक्षक भिंत तसेच सुरक्षारक्षक नसल्याने काही उद्यानांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याच्या मुद्द्याकडेही दै. ‘पुढारी’ने लक्ष वेधले होते.

उद्यानांमधील वृक्षांच्या देखभालीसाठी काही महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीने सुमारे 25 कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचा यापुढे वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. वृक्ष लागवड, पाणी मारणे, स्वच्छता करणे यासंदर्भातील वार ठरवून कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. जर ठरल्यानुसार काम होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. उद्यानांची दुरवस्था दूर करण्याचेही प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले.

Back to top button